आम आदमी पक्ष काँग्रेसचे एजंट म्हणून काम करीत असून या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल वैचारिक नक्षलवादी असल्याची टीका भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ता सैय्यद शहनवाज हुसेन यांनी केली.
भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुस्लिम समाजाच्या संमेलनाच्या निमित्ताने शहनवाज हुसेन नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. केजरीवाल आणि नक्षलवादी यांच्या विचारांमध्ये फारसा फरक नाही. नक्षलवादी शस्त्रे घेऊन जंगलात फिरतात तर केजरीवाल विविध वाहिन्यांचे कॅमेरे घेऊन फिरतात. केजरीवाल हे सामान्यांचे प्रतिनिधी नसून काँग्रेसचे एजंट म्हणून काम करीत आहेत. काँग्रेसचे नेते त्यांचा वापर करीत भाजपला लक्ष्य करीत आहे. केजरीवाल यांच्या कथनी आणि करणी यात अंतर आहे. आम आदमी पक्ष आणि केजरीवाल हा राजकीय फुगा असून काँग्रेसनेच तो फुगवला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे नेते त्याला सुई मारून तो फोडतील आणि त्यांचे अस्तित्व संपवतील. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला. राहुल गांधी यांना सामान्य ज्ञान नसल्यामुळे त्यांनी गांधी हत्येप्रकरणी असे बिनबुडाचे विधान केले आहे. काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांना समज देऊन भाषणातून असे विधान करणे टाळायला सांगावे अन्यथा जनताच त्यांच्या विधानाचा समाचार घेईल. सध्या राहुल गांधी काँग्रेसच्या चेल्यांच्या गराडय़ात वावरत आहेत. त्यामुळे चेले सांगतील तसे राहुल गांधी बोलतात असा टोला हुसेन यांनी लगावला. यापूर्वी देशाच्या संसदेत काँग्रेसच्या खासदारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची स्तुती केली होती याकडे हुसेन यांनी लक्ष वेधले. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर काँग्रेसच्या गोटातून गुजरात दंगलीवरून ठपका ठेवला जातो, परंतु पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यकाळात २३ हजार दंगली झाल्या होत्या. काँग्रेसने या दंगलीचा हिशोब द्यावा, त्यानंतर मोदींवर बोलावे, असेही हुसेन म्हणाले.
वाराणसी मतदारसंघावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये कुठलाही वाद नाही. मोदी यांच्या मतदारसंघाबाबत भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी येत्या १३ मार्चला निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपला २६२ आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ३२२ जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.