अभ्यासाला कंटाळून, परीक्षेला घाबरून शाळेला दांडी मारणारे किंवा मौजमजेसाठी कॉलेजला दांडी मारणारे विद्यार्थी आणि तरूण ही तशी नेहमीची बाब. पण आता कामाच्या त्रासाला कंटाळून डॉक्टरही दांडी मारू लागले आहेत. केईएम आणि जे.जे.मधील दोन डॉक्टरांनी अशीच कुणाला न सांगता दांडी मारली आणि गोंधळ उडवून दिला. या बेपत्ता डॉक्टरांना शोधताना दमछाक झाल्याने पोलिसांना चांगलाच ताप भरला. या दोन्ही डॉक्टरांचे कुणी अपहरण केले नव्हते तर ते कामाच्या ताणामुळे पळून गेल्याचे नंतर उघड झाले.
२१ फेब्रुवारी २०१३
जे. जे.मधील डॉ. योगेश फिरके (२५) अचानक बेपत्ता झाले. त्यांचा मोबाईल बंद होता. ते आपल्या गावी गेले नव्हते की मित्रांकडे गेले नव्हते. सर्वत्र शोधाशोध सुरू झाली. फिरके हे निवासी डॉक्टर होते त्याशिवाय ते भायखळा येथील ग्रँट मेडिकल महाविद्यालयात पेडिआट्रिकच्या पहिल्या वर्गात शिकत होते. सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर अखेर ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविण्यात आली. गोव्यातून त्यांच्या एटीएम कार्डातून पैसे काढले गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांचे कुणी अपहरण केले आहे का असा संशय पोलिसांना आला. त्यांना शोधण्यासाठी पोलीस पथक गोव्यालाही गेले. पण दरम्यान फिरके स्वत:च परतले. कामाच्या ताणामुळे फिरके मौजमजेसाठी गोव्याला गेले होते. त्यांनी कुणालाही न सांगता कामावर दांडी मारली होती. पण त्यांच्या अचानक बेपत्ता होण्याने मोठाच गोंधळ  झाला होता.
२१ एप्रिल २०१३
डॉक्टर बेपत्ता होण्याची दुसरी घटना घडली ती केईएममध्ये. रुग्णालयातील आर्य मिश्रा (२२) हे डॉक्टर २१ एप्रिल पासून अचानक बेपत्ता झाले. पुन्हा तशीच धावपळ आणि शोधाशोध. मित्रांना पत्ता नाही, वरिष्ठांना काही माहीत नाही. मोबाईल फोनही बंद. भोईवाडा पोलिसांकडे हरविल्याची तक्रार दाखल झाली. पोलिसांनी मग मिश्रा यांना शोधण्यासाठी मोहीम उघडली. मिश्रा यांच्या एटीएममधून पुण्याहून पैसे काढले गेल्याची कळले. पुन्हा अपहरणाच्या चर्चा रंगल्या. अखेर मिश्रा सापडले ते ओरिसातील भुवनेश्वर या त्यांच्या मूळ गावी. कामाच्या तणावाला कंटाळून पळून गेल्याची कबुली मिश्रा यांनी पोलिसांना दिली.
हे दोन्ही डॉक्टर कामावर रुजू झाले. पण त्यांच्या ‘सुट्टी’ने अनेक प्रश्नही उपस्थित केले आहे. कामाच्या तणावामुळे अचानक दांडी मारायची आणि पोलिसांसह यंत्रणेला कामाला लावायचे कितपत योग्य असा सवाल केला जात आहे.
 डॉक्टरांच्या दांडीने पोलिसांना मात्र चांगलाच ताप भरला होता. मुळात डॉक्टर म्हटले की हाय प्रोफाईल. मिडियाचा दबाव. त्यामुळे डॉक्टरांना शोधण्यासाठी अमूल्य वेळ खर्च करून यंत्रणा राबवावी लागली. डॉ. फिरके यांनी गोव्याला जाण्याची तयारी आधीच केली होती. त्यासाठी ट्रॅव्हल बॅगही विकत घेतली होती. ते गोव्याच्या कोळवा बीचवर मजा करीत होते आणि आम्ही त्यांना शोधण्यासाठी धडपडत होतो, अशी प्रतिक्रिया जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत सुर्वे यांनी व्यक्त केली.
या दोघांचे पाहून इतरही डॉक्टर पळून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा डॉक्टरांवर वरिष्ठांनीच कडक कारवाई करायला हवी असे पोलिसांचे मत आहे.
.. हे बेजबाबदारपणाचे लक्षण
कामाच्या ताणामुळे दांडी मारली हे पूर्णपणे चुकीचे आहे. हा बेजबाबदारपणा झाला. मुळात कामाचा ताण नाही आणि अशाप्रकारे कुणाला न सांगता निघून जाणे अतिशय बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. ताण होता तर सुटी मागायची होती. आम्ही पण याच परिस्थितीतून कधी गेलो आणि या मोठय़ा पदावर आलो. उगाच कामाचा बाऊ करणे चुकीचे आहे.
    – प्रीती मेनन, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय
डॉ. फिरके यांची ही वैयक्तिक गैरहजेरी
आमच्या रुग्णालयातील डॉ. फिरके वैयक्तिक कारणासाठी गैरहजर होते. कामाच्या ताणामुळे त्यांनी दांडी मारलेली नव्हती. आमच्याकडे सर्व डॉक्टरांना पुरेसा वेळ आणि आराम मिळतो.
डॉ. तात्याराव लहाने, अधिष्ठाता जेजे रुग्णालय