आठ दिवस रंगलेल्या बदली संघर्षांनंतर अखेर जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी सोमवारी कामकाजाला सुरूवात केली. केंद्रेकर यांचे रविवारी शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सोमवारी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी झाली होती. चोख बंदोबस्तात प्रत्येकाला तपासून आत प्रवेश देण्यात आला. मात्र, यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयास छावणीचे स्वरुप आले होते. केंद्रेकर यांनी थेट प्रतीक्षा कक्षात येऊन लोकांचे प्रश्न जाणून घेण्यास सुरुवात केली. रविवारी केंद्रेकर सपत्नीक बीड शहरात दाखल झाले. केंद्रेकर यांनी लगेचच आढावा बैठक घेत काम सुरू केले.
जिल्ह्य़ाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या अधिकाऱ्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. सोमवारी सकाळीच केंद्रेकर यांनी कामकाजाला सुरुवात केली. पोलीस प्रशासनाने कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कडक बंदोबस्त लावल्यामुळे छावणीचे स्वरूप आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाभोवती मोठय़ा संख्येने लोक केंद्रेकर यांना पाहण्यासाठी जमले होते.