सध्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराविषयी अनेकांच्या मनात विविध प्रश्न असतात. आपले वय आणि व्यवसाय यांच्याशी आपला आहार निगडित असावा काय? कामातील वैविध्यानुसार कोणता आहार घ्यावा? लहान मुलांपासून वृद्धांपर्यंतच्या व्यक्तींची पचनशक्ती आणि रुची यांचा विचार करून कशा प्रकारचा आहार असावा? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात रुंजी घालत असतात. या प्रश्नांची थेट उत्तरे ख्यातकीर्त वैद्य प. य. खडीवाले यांच्याकडून मिळण्याची संधी शुक्रवार, ३ जुलै रोजी ठाणेकरांना मिळणार आहे. ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ या पाककृती संग्रहाच्या प्रकाशनानिमित्ताने हा योग जुळून येणार असून या वेळी ठाणेकरांच्या लाखमोलांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन वैद्य खडीवाले करणार आहेत.tv f copy
मुंबईतील वाचकांसाठी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे प्रकाशन झाल्यानंतर आता ठाणेकरांसाठी वैद्य खडीवाले यांच्या पाककृती संग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असून या वेळी आयोजित विशेष कार्यक्रमामध्ये वैद्य खडीवाले उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. वय आणि व्यवसायानुसार खाण्याच्या गरजा बदलत जातात, तसेच विविध व्यवसायांत कार्यरत पुरुष आणि स्त्रियांनाही वेगवेगळ्या पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. हेच लक्षात घेऊन वैद्य प. य. खडीवाले यांनी ‘पूर्णब्रह्म’ हा पाककृती संग्रह तयार केला आहे. या संग्रहाचे प्रकाशन खास ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील नागरिकांसाठी ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता एका विशेष कार्यक्रमात होणार आहे.