कामोठे येथील तीन आसनी रिक्षाचालकांच्या संघटित शक्तीपुढे पोलीस प्रशासन झुकल्याने खांदेश्वरकरांसाठी सुरू होणाऱ्या खांदेश्वर रेल्वेस्थानक ते नवीन पनवेल या मार्गावरील बससेवेला अखेर ब्रेक लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दरबारी रिक्षाचालकांचा प्रश्न लवकरच मांडला जाणार आहे.
खांदेश्वर रेल्वेस्थानक ते नवीन पनवेल या मार्गावरील बससेवेची खांदेश्वर वसाहतीमधील लाखो प्रवासी आजतागायत आतुरतेने वाट पाहात आहेत. ही बस सुरू झाल्यास या प्रवाशांना खांदेश्वर स्थानकातून खांदा कॉलनीतील सेक्टर ९ येथील चौकापर्यंत पाच रुपयांमध्ये पोहोचता येणार आहे. ही बस सुरू झाल्यास त्याचा लाभ नवीन पनवेल सेक्टर ७ व सुकापूर येथील रहिवाशांना होईल. सध्या या पल्ल्यावरील प्रवासासाठी रिक्षाचालक मानसी दहा रुपये भाडे आकारत आहेत. दहा रुपये भाडे दिल्यानंतरही क्षमता नसतानाही रिक्षातून सहा प्रवाशी कोंबले जातात.
येथील लोकप्रतिनिधींनी स्थानिक रिक्षाचालकांविरोधात आवाज न काढण्याचे धोरण अवलंबल्याने प्रवाशांवर ही वेळ आली आहे.
रिक्षाचालकांचे प्रश्न सुटावेत यासाठी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात अलिबाग येथे कामोठे येथील बससेवा सुरू राहण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये रिक्षा संघटनेचे प्रतिनिधी, त्यांचे नेते राजन राजे व सिटिझन युनिटी फोरमच्या (कफ) सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले.
रायगडचे अप्पर जिल्हाधिकारी सतीश बागूल यांनी रिक्षाचालकांना आपल्या कार्यक्षेत्रात कामोठे हा परिसर येत असला तरीही परिवहन व्यवस्था येत नसल्याने आपण या प्रकरणात काही करू शकत नाही असे सांगून हात झटकले. प्रवाशांची बाजू घेताना कफतर्फे अरुण भिसे यांनी रिक्षाचालकांच्या पोटाप्रमाणे प्रवाशांनाही पोट आहे, असा युक्तिवाद या बैठकीत मांडला. अखेर रिक्षाचालकांनी मुख्यमंत्र्यांची याबाबत भेट करून द्या अशी मागणी जिल्हाधिकारी बागूल यांच्याकडे केली. बागूल यांनी लवकरच वेळ घेऊन कळवतो असे सांगितले. त्यामुळे लवकरच कामोठे रिक्षाचालकांचा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला जाणार आहे.
पोलिसांनी रिक्षाचालकांप्रमाणे दहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या खांदेश्वर प्रवाशांची बाजू लक्षात घेऊन ही बससेवा लवकर सुरू करावी, अशी मागणी सामान्य प्रवासी करत आहे. स्थानिक पोलिसांसोबत ज्या विभागाची ही जबाबदारी आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांना या वादापासून दूर राहण्यात धन्यता वाटत असल्याचे चित्र आहे.
परिवहन विभागाच्या पुढाकाराने ही बससेवा सुरू केली, मात्र बससेवा सुरू केल्यानंतर आलेल्या विविध वादांमध्ये कोठेही प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व पोलिसांच्या वाहतूक विभागाचे अधिकारी सहभागी होण्यास तयार नाहीत. तुम्ही लढा आम्ही पाहतो, अशी वृत्ती अंगी बाळगल्याने कामोठे, खांदेश्वर, पनवेलमध्ये एनएमएमटीची बससेवा सुरू होण्याचा तेढ वाढत चालला आहे. यामुळे खांदेश्वरमधील प्रवाशांची घोर निराशा झाली आहे.

रोजगार द्या, बससेवा घ्या!
कामोठे व खांदागाव येथील तीन आसनी रिक्षाचालक स्थानिक आहेत. सिडकोने आमच्या जमिनीचे भूसंपादन करताना येथील स्थानिक शेतकऱ्याला फसविल्याचा आरोप रिक्षाचालकांनी केला आहे. तसेच या रिक्षाचालकांकडे रिक्षा वगळता इतर कोणतेही उदरनिवार्हाचे साधन नसल्याने वसाहतीच्या गल्लीबोळात बस सुरू झाल्यास या रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येईल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे सिडको किंवा एनएमएमटी प्रशासनाने रिक्षाचालकांना कायमस्वरूपी रोजगार द्यावा व खुशाल बससेवा सुरू करावी, अशी या रिक्षाचालकांची मागणी आहे. कामगारनेते राजन राजे यांच्या नेतृत्वाखाली रिक्षाचालक आपल्या हक्कांसाठी लढत आहेत.