खारघर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाला अनेक विघ्ने हात जोडून उभे आहेत. पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा ते उद्घाटनाला मंत्रिमहोदयांना न मिळणारा वेळ या सर्व विघ्नांमुळे खारघरच्या पोलिसांना हक्काचे कार्यालय बनूनही भाडय़ाच्या इमारतीमध्ये पोलीस ठाणे चालविण्याची वेळ आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून खारघर पोलीस भाडय़ाच्या दुमजली रो-हाऊसमध्ये पोलीस ठाणे चालवीत आहेत. कळंबोली पोलीस ठाण्यातून स्वतंत्र कारभार सुरू झाल्यानंतर सुरुवातीला कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या बळाचा सामना येथील प्रभारींना करावा लागला. सायबर सिटीची सुरक्षा ज्या पोलिसांच्या हाती आहे, त्यांना लघुशंकेसाठी, जेवणाचा डब्बा खाण्यासाठी तसेच कार्यालयीन काम करण्यासाठी करावी लागणारी धडपड खारघर पोलीस ठाण्याच्या भाडय़ाच्या जागेत आल्यावर समजते. येथे पावसाळ्यामुळे काही कर्मचारी प्लास्टिक कागद लावून स्वत:चा आणि सरकारी कागदपत्रांचा बचाव करतात. अशा या पोलिसांसाठी सिडकोच्या माध्यमातून हक्काचे ठाणे उभारण्यात आले. या इमारतीच्या भूमिपूजनावेळी कामोठे पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले होते. या दोनही कामांचे कंत्राटदार वेगळे असल्याने एकाने लवकर कामोठे पोलीस ठाण्याची इमारत बांधली, तर दुसऱ्या कंत्राटदाराने कामोठे पोलीस ठाण्याची इमारत बांधून त्या इमारतीमध्ये पोलीस ठाणे सुरू होईपर्यंत खारघर पोलीस ठाण्याच्या इमारतीचा चौथरा बांधला नव्हता. संथगतीने काम झाल्याचा फटका खारघर पोलीस ठाण्याला सहन करावा लागला. त्यानंतर इमारतीचे बांधकाम दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आल्यावर पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी या इमारतीला भेट दिल्यावर पहिल्याच पावसाळ्यात या इमारतीच्या छताला गळती लागल्याचे दिसले. गळतीच्या विघ्नापुढे पोलीस आयुक्तांनी नतमस्तक होऊन निकृष्ट दर्जाच्या कामाकडे बोट दाखवून उद्घाटनापूर्वी इमारतीची ही अवस्था असल्यास येथे कामकाज पोलीस कसे करणार, या इमारतीचे वय तरी किती वर्षे अशा प्रश्नांचा भडिमार आयुक्त प्रसाद यांनी सिडकोला विचारला. याबाबतच्या आयुक्त प्रसाद यांच्या कठोर भूमिकेनंतर सिडकोने संबंधित कंत्राटदाराकडून नव्याने काही छताच्या गळती रोखण्याचे काम करून घेतले. त्यानंतर पोलीस ठाण्याची इमारत कामकाजयोग्य झाली. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवामध्ये या इमारतीमध्ये खारघर पोलीस ठाणे सुरू करण्यासाठी उद्घाटनाचा कार्यक्रम गृहमंत्र्यांच्या हस्ते करण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयाकडून प्रयत्न सुरू झाले. मात्र आचारसंहितेच्या लगबगीमुळे आणि कामकाजाच्या मश्गुलीमुळे गृहमंत्री पाटील यांना वेळ न मिळाल्याने हे उद्घाटन रखडल्याचे समजते. यावर पोलीस आयुक्त प्रसाद यांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर खारघरच्या सामान्य पोलिसांसाठी आणि रहिवाशांच्या सोयीसाठी घटस्थापनेच्या मुहूर्तावर खारघर पोलीस ठाण्याचे उद्घाटन करावे, अशी मागणी सामान्य पोलिसांकडून होत आहे.