शीव-पनवेल महामार्गाचा खारघर टोलनाका मोठय़ा रुग्णवाहिकांना अडथळा ठरू लागला आहे. या रुग्णवाहिकांसाठी जाण्यासाठी मार्ग नसल्याने रुग्णवाहिकेतील गंभीर रुग्णांच्या जीविताचा प्रश्न उभा राहिला आहे.  दुचाकीस्वारांसाठीचा राखीव मार्ग रात्रीच्या दहा वाजल्यानंतर बंद करून या मार्गावरून अवजड वाहनांना सोडण्यात येते. त्यामुळे टोलनाक्यावर रात्रीच्या वेळी येणाऱ्या दुचाकी व रुग्णवाहिकांना या मार्गावरून जाण्याची कसरत करावी लागते. टोल कंपनीने किमान आपत्तीमार्ग म्हणून हा मार्ग खुला ठेवावा अशी मागणी रुग्णावाहिका चालकांकडून होत आहे.
शीव-पनवेल महामार्गाच्या बांधकामाची रक्कम वसूल करण्यासाठी वाहतूक कोंडी करून का होईना टोलवसूल झालाच पाहिजे असे धोरण टोलवसूल कंपनीने अवलंबले आहे. सध्या खारघर व कामोठे येथील टोलनाके वाहतूक कोंडीमुळे चर्चेत आहेत. टोलची रक्कम जमा करण्याच्या नादामुळे अनेकांच्या हक्काच्या वाटाही रोखल्या जात आहेत. या टोलनाक्यातून दुचाकीस्वारांचा खोळंबा होऊ नये म्हणून डाव्या बाजूकडची एक रांग राखीव ठेवली आहे. वेळीच या मार्गावरून निघणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी ही रांग लाभदायक ठरते. मात्र रात्रीचा काळोख पडला की ही सोय बंद केली जाते. याच रांगेतून अवजड वाहने सोडण्यात येतात. त्यामुळे कमाईगिरीचे धोरण अवलंबताना इतरांच्या जीविताचा विचार करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
येथील टोल कर्मचाऱ्यांना विचारल्यावर रात्रीची दुचाकींची संख्या कमी असते तर अवजड वाहनांची संख्या जास्त असते यासाठी असे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र यामुळे टोलनाक्यावर अवजड वाहनांची कोंडी पाहायला मिळते, या गोंधळात दुचाकीस्वारांसहित रुग्णवाहिकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. याबाबत एसपीटीपीएल कंपनीचे प्रवक्ता उमेश सोनावणे म्हणाले, की टोलनाक्यावर येणाऱ्या रुग्णवाहिका ज्या वाहनांच्या रांगेत असतात ती वाहनांची रांग आमचे कर्मचारी लवकरात लवकर सोडतात. काही वेळा इतर वाहनांची टोलवसुली केली जात नाही. त्यामुळे रुग्णवाहिका टोलच्या कोंडीत थांबण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रुग्णवाहिकेसाठी स्वतंत्र लेनची त्यामुळेच सोय केलेली नाही.