News Flash

खंडणीसाठी अपहरणाचा प्रयत्न; मुलाची सुटका, तरुणास अटक

चार वर्षांच्या मुलाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी भरदिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न शहरात झाला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला.

| May 23, 2013 01:55 am

खंडणीसाठी अपहरणाचा प्रयत्न; मुलाची सुटका, तरुणास अटक

चार वर्षांच्या मुलाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी भरदिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न शहरात झाला. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. या मुलाचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला. तीन आरोपींपैकी सचिन कैलास पालखे (वय २१) याला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात सचिनसह मुकेश एकनाथ जाधव व विजय राजेंद्र राऊत हे महाविद्यालयीन तरुण सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
दरम्यान, रात्री उशिरा नारेगाव येथे एका हातगाडीवर अपहरण केलेला मुलगा पोलिसांना सापडला. खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या अन्य दोन आरोपींवर पोलिसांचे लक्ष असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. परिचारिका महाविद्यालयात कर्मचारी असणारे शंकर हरिश्चंद्र अडसूळ यांना मंगळवारी दुपारी मुलाचे अपहरण करण्यात आल्याचा निनावी दूरध्वनी आला. घरी जाऊन त्यांनी खात्री केली असता मुलगा गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणाची फिर्याद त्यांनी पोलिसांत दिली. त्यानंतर तपासाची चक्रे फिरू लागली.
दुपारी २ वाजून २० मिनिटांनी मुलाचे अपहरण करणाऱ्या एकाने आधी १० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानंतर तुम्ही पोलिसांत गेलात, त्यामुळे रक्कम वाढविल्याचे सांगत आरोपींनी २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीच्या रकमेची मागणी ज्या भ्रमणध्वनीवरून केली जात होती, त्याची माहिती उपग्रहाच्या आधारे घेतली जात होती. या प्रकरणात माहीतगार व्यक्तीनेच मुलाचे अपहरण केले असावे, असा पोलिसांचा संशय होता. पहाटे तीनच्या सुमारास सचिन पालखे याला अटक केल्यानंतर या अपहरणामागचा कर्ताकरविता फिर्यादीच्या घरमालकाचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले.
शंकर अडसूळ सिडकोमधील एन १२ मध्ये एकनाथ जाधव यांच्या घरी राहतात. त्यांचा मुलगा मुकेश याने मुलाला खांद्यावर बसवून अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचविले. चारचाकी गाडीतून त्याला पळवून नेण्यात आले. मुकेश जाधव, विजय राऊत व सचिन पालखे या तिघांनी मिळून हे अपहरण केल्याचे स्पष्ट झाले. मात्र, कोणी नक्की काय भूमिका वठविली, हे तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. अपहरण केलेला मुलगा जिवंत हवा असेल तर किती पैसे द्यायचे व कोठे या बाबत तीन वेळा जागा बदलण्यात आल्या. आरोपीने पहिल्यांदा पैसे घेऊन पैठण रस्त्यावर बोलविले. नंतर किराडपुरा येथे भेटू, असे सांगितले व नंतर नारेगाव येथे बोलविण्यात आले.
आरोपी मुकेश जाधव या अपहरणात गुंतलेला असावा, असा त्याच्या पालकांनाही संशय होता. पोलिसांनी शोध सुरू केल्यावर रात्री उशिरा त्याचे पालकही त्याचा शोध घेत होते. पहाटे तीन वाजता अपहरण केलेला मुलगा कोठे आहे याची माहिती मिळाली. त्यानंतर नारेगावच्या राममंदिराजवळील हातगाडीवरून मुलाला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन पालखे जाफराबाद (जिल्हा जालना) तालुक्यातील असून एमजीएमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या पहिल्या वर्षांत शिकत आहे. मुकेश जाधव साई तंत्रनिकेतनमध्ये पहिल्या वर्षांला आहे, तर विजय राजेंद्र राऊत एस. बी.मध्ये बीसीएसचे शिक्षण घेत आहे. आरोपीने ज्या भ्रमणध्वनीचा वापर केला, तो फोन चोरीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. इंजिनिअरिंगच्या परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकाचा फोन चोरल्याचे स्पष्ट झाले. यातील सचिन पालखे याला मोबाईल चोरीची सवय होती. त्याच्याकडे चार-पाच मोबाईल सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 1:55 am

Web Title: kidnapping for tribute relieve of son kidnapper arrested
Next Stories
1 ‘सांगा, आम्ही जगायचे कसे?’
2 पिण्याच्या पाण्याचे तातडीने नियोजन करा – डॉ. कदम
3 भाजप युवा मोर्चाची मदार प्रथमच महिलेकडे
Just Now!
X