पैशाच्या वादातून जुन्या नाशिक परिसरातील एकाचे अपहरण करत त्याला जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
भदक्राली परिसरातील रहिवाशी असलेल्या सत्तार शेख यांचा ओळखीच्या व्यक्तींशी काही आर्थिक व्यवहार झाला होता. नियोजित वेळ उलटून गेल्यानंतरही शेख यांच्याकडून पैशाची पुर्तता होऊ शकलेली नाही. याबाबत तगादा लावूनही व्यवहारातील ४० हजार रुपये परत न मिळाल्याने संशयिताने शेख यांचा पुतणा भंगार दुकानात बसला असताना त्याला जाब विचारला. काका पैसे देत नाही असे म्हणत त्याला शिवीगाळ व दमदाटी केली. पुतण्याकडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असतांना सोबत आणलेल्या चारचाकी वाहनात त्याला डांबण्यात आले. वाहनात त्याला मारहाण करण्यात आली. त्र्यंबकनाका सिग्नल परिसरात पुढील अनंत कान्हेरे मैदानाजवळ त्याला सोडून देण्यात आले. मारहाणीत त्याला गंभीर दुखापत झाली असून खासगी रुग्णालयात पुढील उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.