मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त रुग्णांना सोनोग्राफी आणि कलर डॉपलर चाचणीसाठी करावी लागणारी प्रतीक्षा आणि त्यानंतर डायलिसिससाठी ठरावीक खासगी रुग्णालयातूनच फिस्तुला बसवून घेण्यासाठी केला जाणारा आग्रह यामुळे केईएम रुग्णालयातील काही डॉक्टरांबद्दल संशय निर्माण झाला आहे. दरवर्षी केईएममध्ये उपचारासाठी मूत्रपिंड विकाराने ग्रस्त रुग्ण हजारोंच्या संख्येने येत असले तरी २०११ आणि २०१२ मध्ये केवळ ९४ रुग्णांनाच फिस्तुला बसविण्यात आला असून अन्य रुग्णांना त्यासाठी खासगी रुग्णालयाकडे पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे माहिती अधिकारात या रुग्णांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता ही माहिती पद्धतशीरपणे दडवण्याचाच प्रयत्न रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
मूत्रपिंडाच्या रुग्णांना आठवडय़ातून २-३ वेळा डायलिसिस करावे लागते. गरीबांना हा खर्च परवडणारा नसतो. त्यामुळे सामाजिक संस्थांकडून मदत मिळविण्यासाठी त्यांना वणवण करावी लागते. हे रुग्ण मोठय़ा संख्येने केईएममध्ये येतात. यापैकी काहींना तातडीने डायलिसिसची आवश्यकता असते. त्यासाठी सुरुवातीला रुग्णाच्या मानेवर अथवा मनगटावर कॅथेटर बसवावे लागते. सुमारे तीन हजार रुपये किमतीचे कॅथेटर योग्य पद्धतीने बसविण्यात आले नाही, तर पुन्हा आवश्यक त्या चाचण्या करून नवे कॅथेटर बसवावे लागते. अशा रुग्णांच्या मनगटावर कॅथेटर बसविण्यास केईएम रुग्णालयात स्पष्ट नकार देण्यात येतो. माटुंगा येथील सोबती रुग्णालयात जाऊन कॅथेटर बसवून घेण्याचा आग्रह काही डॉक्टरच करीत असल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. दिलीप साखरकर यांची बहीण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असल्याने तिला कॅथेटर बसविण्यासाठी त्यांना वणवण करावी लागली होती. त्यामुळे केईएम रुग्णालयात उपचारासाठी मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त किती रुग्ण आले, त्यापैकी किती रुग्णांना कॅथटर बसविण्यात आले, त्यांची नावे आणि पत्ते द्यावेत, किती जणांना खासगी रुग्णालयात कॅथेटर बसविण्यास सांगण्यात आले आदी माहिती मिळविण्यासाठी साखरकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज केला होता. केईएममध्ये चार पाळ्यांमध्ये दरदिवसाला २५ ते ३० रुग्णांवर डायलिसिस केले जाते. रुग्णांवर २०११ मध्ये ६,४६९, तर २०१२ मध्ये ७,७१६ वेळा डायलिसिस करण्यात आले. मात्र गेल्या दोन वर्षांमध्ये अवघ्या ९४ रुग्णांना कॅथेटर बसविण्यात आले, अशी माहिती रुग्णालयाने साखळकर यांना दिली. त्यासोबत कॅथेटर बसविण्यात आलेल्या ९४ रुग्णांच्या नावाची यादीही दिली. परंतु या यादीमधील रुग्णांच्या मोबाइल क्रमांकांवर रुग्णालयाचे स्टँम्प मारण्यात आले आहेत. रुग्णांकडे कॅथेटर बसविल्याबाबत खातरजमा करता येऊ नये यासाठी मोबाइल क्रमांकांवर स्टँम्प मारण्यात आले आहेत, असा आरोप साखरकर यांनी केला आहे. त्यामुळे आता साखरकर यांनी या रुग्णांच्या पत्त्याची मागणी केली आहे. परंतु ती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
गंभीर दखल घेणार..
माहितीच्या अधिकाराअंतर्गत उपलब्ध केलेल्या रुग्णांच्या माहितीमधील मोबाइल क्रमांकांवर स्टँम्प मारण्यात आले असून ही गंभीर बाब आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे पालिकेच्या संचालिका (वैद्यकीय शिक्षण आणि प्रमुख रुग्णालये) डॉ. सुहासिनी नागदा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.