शहरी भागामध्ये ‘अँग्री बर्ड’ खेळण्यापुरताच ‘बर्ड’ या शब्दाशी संबंध असलेल्या मुलांची आपल्या जवळपासच्या परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल, उत्सुकता चाळवण्याऱ्या ‘किड्झ बर्ड्स इन अर्बन इंडिया’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले.
आजूबाजूचा परिसर, बागा, या ठिकाणी आढळणाऱ्या पक्ष्यांशी शहरामध्ये राहणाऱ्या मुलांची ओळख व्हावी, पक्ष्यांबाबत उत्सुकता निर्माण व्हावी या हेतूने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. इंग्रजीमध्ये असलेल्या या पुस्तकाचे लेखन संजय मोंगा यांनी केले आहे. युहिना इको मीडियाने या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. सोपी भाषा आणि आकर्षक मांडणी हे या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे. उद्यान, मैदान अशा ठिकाणी आढळणारे पक्षी, गवताळ प्रदेशात आढळणारे पक्षी, पाणथळ प्रदेशात आढळणारे पक्षी अशी वर्गवारी करून पक्ष्यांची माहिती देण्यात आली आहे. पक्ष्यांची नावे, त्यांचा अधिवास, त्यांचे खाणे, आवश्यक वातावरण, दिसण्यातील वैशिष्टय़े अशा विविध गोष्टींबाबत या पुस्तकामध्ये माहिती देण्यात आली आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांच्या अधिवासावर होणारा परिणाम, त्यांची कमी होणारी संख्या या गोष्टींची जाणीवही या पुस्तकातून करून देण्यात आली आहे. पक्ष्यांची नुसतीच माहिती वाचण्यापेक्षा मुलांनी बाहेर पडून पक्षी पाहावेत यासाठी पक्षी निरीक्षणाच्या डायरीच्या स्वरूपामध्ये या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक पक्ष्याच्या माहितीबरोबर त्याचे चित्र देण्यात आले आहे. मुलांना पक्षी कुठे दिसला, कधी दिसला ते लिहिण्यासाठी चित्राखाली जागा सोडण्यात आली आहे. पुस्तकामध्ये देण्यात आलेले पक्ष्यांच्या छायाचित्रांचे स्टीकर्स हे मुलांसाठी आणखी एक आकर्षण असणार आहे. पक्षी प्रत्यक्ष पाहून त्याची माहिती लिहिल्यानंतर त्या पक्षाच्या छायाचित्राचा स्टीकर ओळखून मुलांनी तो काढायचा आहे. शहरी भागातील मुलांमध्ये पक्ष्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली असली, तरी या पुस्तकाची आकर्षक मांडणी मोठय़ांनाही भुरळ घालणारी आहे.