News Flash

नाशिकसाठी किकवी प्रकल्प अत्यावश्यक

औद्योगिकरण, महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणातही वाढ होत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी

| January 9, 2014 07:54 am

औद्योगिकरण, महाविद्यालयांची संख्या वाढत असल्याने शहरातील लोकसंख्येच्या प्रमाणातही वाढ होत असून या वाढत्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी उपयुक्त असलेल्या गंगापूर धरण समुहातील किकवी प्रकल्पाची उभारणी अत्यावश्यक झाली आहे. परंतु या प्रकल्पाच्या उभारणी मार्गात पर्यावरण मंत्रालयातील काही तरतुदींचा अडथळा असल्याने ते दूर करून या प्रकल्पाला तातडीने मंजुरी देण्याची मागणी खा. समीर भुजबळ यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री वीरप्पा मोइली यांच्याकडे केली आहे.
या प्रकल्पामुळे नाशिकच्या भविष्यातील पिण्याच्या पाण्याची तहान भागविणे शक्य होणार आहे. त्याशिवाय गोदावरीला येणाऱ्या पुरामुळे नाशिकला होणाऱ्या धोक्यावरही नियंत्रण येणार आहे. खासदारांनी किकवी प्रकल्पासाठी तत्कालीन केंद्रीय वनमंत्री जयंती नटराजन यांची यापूर्वी अनेकदा भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळवाडे आणि ब्राह्मणवाडे गावच्या परिसरात किकवी धरण प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प १७२.४६ हेक्टर वनजमिनीवर साकारला जात आहे. त्याच्या मंजुरीसाठी भोपाळ येथील अतिरिक्त वन संरक्षकांनी प्रकल्पस्थळी भेट देऊन मंत्रालयाकडे शिफारस पाठविली आहे. या प्रकल्पातील वन जमिनीच्या वापरासाठी वन सल्लागार समितीच्या सदस्यांची परवानगी मिळणे अपेक्षित आहे.
गंगापूर धरणात किकवी, गौतमी तसेच कश्यपी धरणाचे पाणी येते. किकवी नदी गंगापूर धरणाच्या वरील बाजूला असल्यामुळे या धरणाचा उपयोग नाशिकच्या पूरस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठीही होणार आहे. किकवी नदीचे पाणी नियोजित किकवी धरणात अडविले जाईल. हे धरण पूर्ण भरल्यानंतर त्याचा विसर्ग गंगापूर धरणात होईल. त्यामुळे वारंवार येणाऱ्या पुरामुळे नाशिक शहरात गोदाकाठी जी परिस्थिती निर्माण होते, त्यावर नियंत्रण मिळविता येणे शक्य होणार आहे.
सुमारे ६०० कोटीच्या या प्रकल्पामुळे गंगापूर धरणावरील भार हलका होणार आहे. गंगापूर धरणात प्रचंड प्रमाणात गाळ  साचल्याने त्याची साठवण क्षमता अत्यंत कमी झाली आहे. धरणातील हा काळ काढण्यासाठी सुमारे १५०० कोटी रूपये खर्च करावे लागणार आहेत. इतका पैसा खर्च करण्याऐवजी किकवी प्रकल्प उभारणे परवडणारे आहे. या प्रकल्पासाठी सुमारे सहाशे कोटी रूपयांचा खर्च येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 7:54 am

Web Title: kikvi project important for nashik
Next Stories
1 शासकीय सहकार कृती समितीचे अधिकार वाढविण्याची मागणी
2 कळवणमध्ये कोल्डमिक्स तंत्राने डांबरीकरण
3 ठेवीदारांना सहकार्याचे माजी संचालकांचे आवाहन
Just Now!
X