गेल्या बारा दिवसांपासून संपावर असलेल्या जिल्हय़ातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी शुक्रवारी नगरला जिल्हा परिषदेवर मोर्चा नेऊन जोरदार निदर्शने केली. या आंदोलनात या कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. त्यांनी जि.प.चे आवार दणाणून सोडले.
राज्य संघटनेच्या निर्णयानुसार विविध मागण्यांसाठी जिल्हय़ातील अंगणवाडी सेविका व मदतनीस गेल्या दि. ६ पासून संपावर गेल्या आहेत. गेल्या बारा दिवसांत त्यात कोणताही मार्ग निघालेला नाही. यासंदर्भात शुक्रवारी या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेत निदर्शने केली. कॉ. राजेंद्र बावके, मदिना शेख, बाळासाहेब सुरुडे, आशाताई जाजू आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल गुप्ता यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे, की अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. या कर्मचाऱ्यांना कामगार या संज्ञेत सामावून घेऊन त्यांना वर्ग ३ व वर्ग ४चे लाभ द्यावे, सेवानिवृत्तिवेतन सुरू करावे, कामगार कायद्यातील तरतुदीनुसार दिवाळीला एक महिन्याचा वेतन बोनस म्हणून द्यावे, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना महागाईभत्ता लागू करावा, प्राथमिक शाळेच्या धर्तीवर अंगणवाडी केंद्रांना उन्हाळय़ाची सुटी द्यावी, आजारपणाची रजा मिळावी आदी मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.