केंद्रात भाजपप्रणीत रालोआला स्पष्ट बहुमत मिळाल्याने उत्साहित झालेल्या भाजप खासदारांनी तातडीने लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कंबर कसली आहे. यात किरीट सोमय्या यांनी आघाडी घेतली आहे. ईशान्य मुंबईतून खासदारकीची माळ गळ्यात पडून आठवडाही उलटत नाही तोच सोमय्या यांनी रेल्वेप्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यात पुढाकार घेतला. त्यांनी बुधवारी सकाळी कांजूरमार्ग रेल्वेस्थानकाची पाहणी केली. तब्बल सव्वा तास ते स्थानकावर होते. या वेळी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आलोक बडकुल आदी अधिकारी त्यांच्यासह होते.
भाजपची संसदीय पक्षाची बैठक संपल्यानंतर मुंबईत परतलेले खासदार सोमय्या बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात पोहोचले. कांजूरमार्ग पूर्व येथून कल्याण दिशेला असलेल्या पुलावरील तिकीट बुकिंग सेंटरची पाहणी करून सोमय्या कांजूरमार्ग फलाटावर उतरले आणि क्रमांक एकच्या बाजूने रुळांवरून पलीकडील मोकळ्या जागेवर गेले. या जागेवर आता आणखी एक फलाट तयार होणार असून त्यामुळे कांजूरमार्ग स्थानकातील पादचारी पुलावरील ताण कमी होणार आहे. त्याचप्रमाणे येथे एक नवीन पादचारी पूलही तयार होणार असून तो कल्याण दिशेकडे असलेल्या पालिकेच्या पुलाला जोडण्यात येणार आहे. ही योजना डिसेंबर २०१३मध्येच एमआरव्हीसीने मंजूर केली असून गेले तीन महिने याबाबतच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सोमय्या यांनी या ठिकाणी फक्त पाहणी केली.
प्रवाशांसाठी या फलाटावर काय सुविधा आहेत, याबाबतची पाहणी मात्र सोमय्या यांनी केलीच नाही. किंबहुना सोमय्या यांनी किमान एकदा तरी संपूर्ण फलाट फिरतील अशी अपेक्षा होता. हा खासदार आपल्याशी बोलून आपल्या अडचणी जाणून घेईल, या आशेने काही प्रवासी थांबले होते. मात्र त्यांची ही अपेक्षा फोलच ठरली. त्याऐवजी सोमय्या यांनी येथील कंत्राटदाराच्या केबिनमध्ये जाऊन निगम व इतर रेल्वे अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करणे पसंत केले.
इच्छाशक्तीने कामे होतील
येत्या एक महिन्यात मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरवण्यास सुरुवात केली जाणार आहे. मोदी सरकार आल्यानंतर एका महिन्यातच तुम्हाला हे बदल पाहायला मिळतील, असे सोमय्या यांनी सांगितले. मात्र रेल्वेकडे पैशांची चणचण असल्याने अनेक विकास प्रकल्प अडकून पडले आहेत. सोमय्या यांच्या मते रेल्वेच्या प्रकल्पांसाठी पैशाची नाही, तर इच्छाशक्तीची गरज आहे. आपल्याकडे इच्छाशक्ती असल्याने ही कामे लवकर होतील, असे उत्तर त्यांनी दिले.
मंत्रिपदाबाबत मात्र मौनच!
तुम्ही रेल्वेमंत्री पदासाठी उत्सुक आहात का, असा प्रश्नही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना आडून आडून विचारला. मात्र आपल्याला मुंबईकरांची सेवा करायची आहे. मंत्रिपद मिळाले किंवा नाही मिळाले, आपण कामे करतच राहणार आहोत, असे सोमय्या यांनी सांगितले.