मिरजेतील श्री अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवासाठी यंदा प्रख्यात गायिका कीर्ती शिलेदार, पं. शौनक अभिषेकी, मंजूषा कुलकर्णी-पाटील, पं. अनंत तेरदाळ, प्रमोद गायकवाड, रवि गाडगीळ आदी मान्यवर गायनसेवा सादर करणार आहेत. हा महोत्सव ५ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर २०१३ या दरम्यान होत असून, महोत्सवाचे हे ५९वे वर्ष आहे.
संगीत महोत्सवाचे उद्घाटन प्रख्यात गायिका कीर्ती शिलेदार यांच्या मधुमधुरा या नाटय़गीत गायनाने होत असून, दि. ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभास उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष  मदन पाटील, आमदार सुरेश खाडे, महापौर कांचन कांबळे, किशोर जामदार आदी उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवाचे दुसरे पुष्प पुण्यातील पं. प्रमोद गायकवाड गुंफणार असून, ते शहनाईवादन करणार आहेत. या दिवशी ऋतुजा पालवे (दहिवडी), किरण लोकरे व ग्रुप यांचे नृत्य सादर होणार आहे. तसेच स्वरताल मंच पुणे यांच्या वतीने राम कदम यांच्या मराठी गाण्यांचा कार्यक्रम गायिका पद्मजा लामरुड यांच्या सहकार्यासह सादर केला जाणार आहे. दि. ७ ऑक्टोबर रोजी रवि गाडगीळ (पुणे) यांचे सतारवादन व मंजूषा कुलकर्णी-पाटील यांचे गायन सादर होणार आहे. दि. ८ ऑक्टोबर रोजी दांडिया नृत्याचा कार्यक्रम दुपारी सादर केला जाणार असून, प्राशेक व अभिषेक बोरकर (पुणे) यांच्यामध्ये सरोदवादनाची जुगलबंदी पेश होणार आहे. दुसऱ्या सत्रात मंगला जोशी आणि पं. अनंत तेरदाळ यांचे गायन होणार आहे.
संगीत सभेचे पाचवे पुष्प बुधवार दि. ९ ऑक्टोबर रोजी सुनील अवचट (पुणे) यांच्या बासरीवादनाने सुरू होणार असून पं. हृषीकेश बोडस आणि कल्पना झोकरकर गायन सादर करणार आहेत. दि. १० ऑक्टोबर रोजी सादर होणाऱ्या संगीतसभेचे पं. शौनक अभिषेकी यांचे गायन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याच दिवशी मृण्मयी सिकनीस फाटक (पुणे) यांचे गायन व डॉ. धनंजय दैठणकर यांचे संतुरवादन सादर होणार आहे. दि. ११ ऑक्टोबर रोजी स्वरदा राजेपाध्ये (सातारा), चतन्य गोडबोले (बेळगाव) आरती नायक (गोवा) हे कलाकार गायन सादर करणार असून, धनश्री आपटे व सहकारी भरतनाटय़म सादर करणार आहेत.
संगीत सभेचे सांगता दि. १२ ऑक्टोबर रोजी प्रा. आविराज तावडे (नाशिक) यांच्या गायनाने होणार असून, याच दिवशी कौस्तुभ देशपांडेनिर्मित ‘आनंद-तरंग’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याच दिवशी दुपारी मयूरी, रेवती फडके यांचे नृत्य, चतन्य कोरे, विपुल प्रभू यांचे सोलो तबलावादन, अतिश चौधरी ग्रुपचे नृत्य, अमिषा करंबळेकर यांच्या शिष्यांचे कथ्थक नृत्य व श्रेया ताम्हणकर यांचे बासरीवादन सादर होणार आहे.
यंदाचे हे संगीत महोत्सवाचे ५९ वर्ष असून, संगीत महोत्सव दिमाखदारपणे साजरा करण्यासाठी तयारी पूर्ण होत आल्याचे मंडळाचे अध्यक्ष मधू पाटील, नियाज अहमद ऊर्फ बाळासाहेब मिरजकर यांनी सांगितले.