स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘किसान कैफियत’ मोर्चा खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली उद्या, १८ डिसेंबरला विधान भवनावर धडकणार असून सुमारे वीस हजार शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती संघटनेचे प्रदेश प्रवक्ते गजानन अमदाबादकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर, अमरावती, बुलढाणा, वाशीम, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्य़ातून शेतकरी येतील. खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत, युवा प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर मोर्चाचे नेतृत्व करतील. स्वामीनाथन समितीच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के असा भाव मिळावा, सर्व शेतमालावरील निर्यातबंदी कायमची हटवून अनावश्यक शेतमाल आयातीचा धंदा शासनाने बंद करावा, विदर्भाचा सिंचन अनुशेष भरून अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करावे, सिंचन घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे, विदर्भातील पाण्यावर शेतकऱ्यांचा हक्क असून वीज कंपन्यांना लागणारे पाणी पुरवठा बंद करावे, कृषी पंपांचे कनेक्शन तोडणे थांबवावे, शून्य वीज देयक व कृषी पंपांना चोवीस तास वीज पुरवावी, महागाईच्या नावावर शेतमालाचे भाव पाडणे बंद करावे, कापूस, सोयाबीन, तूर, हरभराच्या हमीभावात वाढ करावी आदी मागण्या आहेत.  यशवंत स्टेडियमपासून दुपारी १२ वाजता मोर्चा निघणार असून या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन सीताराम भुते (वर्धा), अ‍ॅड. विनायक काकडे (यवतमाळ), संजय कोल्हे (अमरावती), गजानन अमदाबादकर (वाशीम), रविकांत तुपकर (बुलडाणा), नारायण जांभुळे (चंद्रपूर), एम.डी. चलाख (गडचिरोली), संजय उरकुडे (नागपूर) या जिल्हाध्यक्षांनी केले आहे.