मकरसंक्रातीच्या पर्वावर शहरातील विविध भागात पतंगांचा उत्सव सुरू झाला आहे. मांजा आणि पतंग तयार करणाऱ्या दुकानदारांकडे गर्दी वाढू लागली आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात पतंगांची बाजारपेठ आहे. या निमित्ताने विदर्भात दीड कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याची माहिती पतंग व्यावसायिकांनी दिली.
शहरातील पतंगांच्या बाजारपेठा वेगवेगळ्या आकारातील पतंग आणि मांजानी सजल्या आहेत. शहरात बाभूळखेडा, बेझनबाग, तांडापेठ, हसनबाग, जुनी शुक्रवारी या भागात मोठय़ा प्रमाणात पतंग तयार करण्यात येत असून या भागात वर्षभर हा उद्योग चालतो. गेल्या आठवडाभरापासून थंडीने हुडहुडी भरलेली असली तरी उत्साही युवकांनी पंतग उडविणे सुरू केले आहे. आकाशात विविध रंगांचे पतंग दिसू लागले आहेत.  मकरसंक्रातीला प्रत्येकजण पतंग उडविण्याचा आनंद घेतो.
जुनी शुक्रवारी आणि इतवारी भागात पतंग आणि मांजाची बाजारपेठ सजली आहे. शहरातील काही पतंग तयार करणाऱ्या कारखान्याला भेटी दिल्या असता बाभूळखेडा भागातील कैलास पाटील या व्यावसायिकाने सांगितले, पतंग आणि मांजा तयार करण्याचा व्यवसाय पिढीजात आहे. वर्षभर हा व्यवसाय करीत असतो. साधारणात: दिवाळीनंतर या कामाला गती मिळते. माझ्याकडे चार कामगार असून कुटुंबातील लोकही मदत करीत असतात. वर्षांला वेगवेगळ्या आकारातील एक लाखावर पतंग तयार करीत असतो. आमच्याकडील माल विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगमध्ये विक्रीला जातो. पतंग तयार करणे ही कला आहे. एक मोठा पतंग तयार करण्यासाठी साधारणत: १५ ते २० मिनिटे लागतात, असेही पाटील म्हणाले.
शहरात पतंगांची मोठी बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी कोटय़वधी रुपयांची उलाढाल होत असते. एका महिन्यात वेगवेगळ्या आकारातील ३ ते ४ हजार पतंग तयार करीत आहोत. आमच्याकडून ठोक विक्री करणाऱ्यांकडे माल जात असतो. किरकोळ विक्री आम्ही करीत नाही. बाजारात अग्नी, सकल आठ, महासकल आठ, एके ५६, गेंडा, हातोडा, कलिंगडा  अशा नावाचे मांजा विक्रीला आले आहे. मांजा बनविणाऱ्या दुकानदारांकडे मांजाची निर्मिती करणारे कारागीर व्यस्त आहेत. अनेकांनी त्यांच्याकडे मांजा तयार करण्यासाठी आरक्षण केले आहे. चांगला मांजा तयार करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.
जुनी शुक्रवारी भागातील बाजारपेठही पतंग आणि मांजानी सजली आहे. दुकांनामधील फिरक्यावर चमकणारे विविध रंग सर्वाना आकर्षित करीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मांजाच्या किमतीत वाढ झाली आहे. मांजा भरलेल्या चक्रीला यावर्षी मोठी मागणी आहे. वस्तीमध्ये मांजा तयार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मांजामध्ये ४० पेक्षा अधिक प्रकार आहेत. साधारणत:  एका चक्रीमध्ये ५ ते ६ रीळ मांजा असून २५० ते ३०० रुपयाला त्याची विक्री केली जाते. बरेली आणि संखलच्या मांजाचा दर्जा चांगला असल्यामुळे तो महाग आहे. विविध आकारातील पतंग ५ रुपयापासून ३०० रुपयांपर्यंत विक्रीला आहेत.