पक्षी व लोकांच्या जिवावर बेतण्यास कारक ठरलेला ‘नायलॉन’ धागा पतंगांसाठी वापरण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी आणली असली तरी त्याची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत असल्याचे बाजारपेठेत फेरफटका मारल्यावर लक्षात येते. मकरसंक्रांतीच्या पाश्र्वभूमीवर, अचानक बंदीचा निर्णय घेतला गेल्याने भरलेला माल खपविण्यावर विक्रेत्यांचा भर असला तरी प्रशासनाचे तिकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, बाजारपेठेत विविध आकारांचे पतंग विक्रीसाठी उपलब्ध असले तरी विमानाच्या आकारातील चिनी पतंग सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत.
सर्रासपणे विकला जाणारा नायलॉन धागा १२० रुपये रीळ याप्रमाणे असून बरेलीच्या तुलनेत पांडा मांज्याला पतंगप्रेमींकडून मोठी मागणी आहे. यंदा छुप्या पद्धतीने नायलॉन धागा विकला गेला तरी पुढील वर्षांपासून त्यावर पूर्णपणे बंदी टाकली जाईल, असे पतंग व्यावसायिकांनी म्हटले आहे. आबालवृद्धांसह बच्चे कंपनीची पतंग व मांजा खरेदीसाठी सध्या रविवार कारंजा, घनकर लेन, शनिवार पेठ, कानडे मारुती व भद्रकाली परिसरातील प्रमुख दुकानांवर गर्दी उसळली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यापाठोपाठ शहरातही नायलॉन धाग्यावर बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता; तथापि विक्रेत्यांनी तत्पूर्वीच नायलॉन धागा मोठय़ा प्रमाणात खरेदी केल्यामुळे त्याची विक्री न करणे म्हणजे मोठे नुकसान सोसावे लागणार असल्याने नाइलाजास्तव तो विकावा लागत असल्याची समस्त विक्रेत्यांची भावना आहे. परिणामी, अनेक दुकानांमध्ये सर्रासपणे तो विकला जात असला तरी प्रशासन व यंत्रणेला त्याचा थांगपत्ता नाही. या धाग्याचे विघटन होत नसल्याने वर्षभर तो पशू-पक्ष्यांसाठी त्रासदायक ठरतो. इमारती व झाडांवर अडकलेल्या नायलॉन धाग्यामुळे अनेक पक्ष्यांना प्राण गमवावे लागल्याची तक्रार नेचर क्लब ऑफ नाशिकसह अनेक पक्षिप्रेमी संघटनांनी करून त्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. याशिवाय दुचाकी वाहनधारकांसाठीही उडणाऱ्या पतंगाचा हा धागा प्राणघातक ठरू शकत असल्याने जिल्हा प्रशासनाने आधी जिल्ह्यात व नंतर शहरातही नायलॉन मांज्याची विक्री, खरेदी यावर बंदी आणली. प्रशासनाचा हा निर्णय कागदावर राहिल्याचे लक्षात येते, कारण शहरासह ग्रामीण भागातील बहुतेक दुकानांवर या मांज्याची विक्री केली जात आहे. अर्थात, ही विक्री न केल्यास या हंगामात मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागेल, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
प्रशासनाने हा निर्णय अगदी अखेरच्या टप्प्यात ऐन वेळी घेतला. तत्पूर्वीच, बहुतेक विक्रेत्यांनी ५० ते ६० हजारांची गुंतवणूक करून पतंग व मांज्याची खरेदी केली होती. नायलॉन धाग्याला प्रचंड मागणी असल्याने तो माल बहुतेकांनी अधिक प्रमाणात भरला. आता तो विक्रीच केला नाही तर मोठे नुकसान सहन करावे लागेल, असे अनेकांनी म्हटले आहे. ही बाब विक्रेत्यांच्या संघटनांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निदर्शनास आणून दिल्याचे सांगण्यात आले. पुढील वर्षांपासून विक्रेते स्वत:हून या मांज्याच्या खरेदी-विक्रीवर बंदी टाकतील, असा दावाही विक्रेत्यांनी केला.
या घडामोडींमुळे नायलॉन धाग्यावरील बंदीची अंमलबजावणी पुढील वर्षीपासून होईल, असे दिसत आहे.पतंगप्रेमींकडून पांडा धाग्याला चांगली मागणी आहे. १५० ते ३५० रुपये रीळ असे त्याचे दर असून बरेली हा धागा साधारणत: १०० रुपये रीळपासून उपलब्ध आहे. सहा तारी, नऊ तारी व बारा तारी यावरून मांज्याचे दर ठरतात. पांडा प्रकारातील ‘फरिदबेग’ या ३५० ते ४०० रुपये असा दर असणाऱ्या मांज्याला ग्राहकांकडून पसंती मिळाल्याचे विक्रेत्यांनी म्हटले आहे.
नेहमीच्या पारंपरिक पतंगाबरोबर यंदा वैविध्यपूर्ण आकारांतील चिनी पतंगाची बाजारात गर्दी झाली आहे. विमानाच्या वेगवेगळ्या आकारांतील या पतंगाची किंमत २५ पासून ३०० रुपयांपर्यंत आहे. चिनी पतंगांतील मोठय़ा आकाराचे पतंग उडविण्यासाठी मैदानावर जावे लागते. त्यामुळे उत्सुकता असणाऱ्या पतंगप्रेमींनी त्यांच्या खरेदीस प्राधान्य दिले आहे. पारंपरिक पतंग आकारानुसार ५० ते ८० रुपये डझन दराने उपलब्ध आहेत.