तरुणाईच्या आवडीनिवडींमध्ये झालेले बदल, पतंग शौकिनांचे मोठय़ा प्रमाणावर झालेले स्थलांतर, महागाई आणि पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी पतंग उडविण्याविरुद्ध सुरू असलेली जनजागृती आदी विविध कारणांमुळे यंदा पतंग-मांजावरच संक्रांत आली आहे. एके काळी संक्रांतीच्या आदल्या दिवशी पतंग शौकिनांच्या गर्दीने फुलून जाणारी दुकाने यंदा मात्र ओस पडली. यंदा पतंग-मांजाच्या विक्रीमध्ये तब्बल ५० टक्क्य़ांनी घट झाली असून विक्रेते चिंतेत पडले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये संगणकाच्या महाजालात अडकलेल्या तरुणाईला मोबाइलचीही भुरळ पडली आहे. तासन्तास संगणक किंवा मोबाइलवर खेळ खेळण्यात गुंग झालेल्या तरुणांना मैदानी खेळांचा विसर पडला आहे. इतकेच नव्हे तर पतंग उडविण्यातही तरुणांना रस राहिलेला नाही. गेल्या पाच वर्षांपासून पतंग-मांजा विक्रीमध्ये मंदी आली आहे. यंदा तर ५० टक्क्य़ांनी विक्री घटली आहे, अशी व्यथा पतंग विक्रेते दिनेश वालिया यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. गिरगाव परिसरातील सिक्कानगरमध्ये १९५५ च्या सुमारास दासभाई वालिया यांनी पतंग-मांजा विक्रीचे ‘दासभाई पतंगवाला’ नावाने दुकान सुरू केले. आजघडीला दासभाई यांचे पुत्र दिनेश वालिया दुकानाचे कामकाज पाहतात. आता दिनेश यांचा चार्टर्ड अकाऊंटंट झालेला पुत्र मिथुलही आपल्या वडिलांच्या मदतीसाठी दुकानात येतो.त्याकाळी ऑक्टोबर महिना उजाडल्यानंतर आकाशात पतंग भिरभरू लागायचे आणि गच्चीवरून ‘काय पोछे’च्या आरोळ्या कानी पडायच्या. दिवाळीच्या सुट्टीमध्ये तर लहाना-मोठय़ांपर्यंत सर्वच जण पतंग आणि फिरकी घेऊन गच्चीची वाट धरायचे. मकर संक्रांत म्हणजे पतंग शौकिनांसाठी पर्वणीच असायची. पतंग-मांजा खरेदीसाठी संक्रांतीच्या आदल्या दिवशी दुकानांमध्ये तोबा गर्दी व्हायची. पण आता परिस्थिती बदलली आहे. शौकिनांची प्रतीक्षा करावी लागते, असे सांगून दिनेश वालिया म्हणाले की, मकर संक्रांत जवळ येताच आम्ही शाळा सुटल्यानंतर वडिलांच्या मदतीसाठी दुकानात यायचो. खरेदीसाठी येणारे शौकीन पतंग आणि मांजाचा कस पाहून खरेदी करायचे. चांगला मांजा अथवा पतंगांची त्यांना नेमकी पारख असायची. बडोदा, अहमदाबाद, खंबाट, बरेली रामपूर आदी ठिकाणचे पतंग शौकिनांच्या पसंतीस उतरायचे. बरेलीचा बारीक मांजा आणि सुरतच्या जाडा मांजाला प्रचंड मागणी होती. आज अशा शौकिनांची संख्या घटली आहे.
पतंग निर्मितीच्या कामामध्ये कौशल्याची आवश्यकता आहे. एके काळी पतंग बनविणारे कसबी कारागीर होते. परंतु कालौघात या कारागिरांची संख्या घटत गेली आणि मनुष्यबळाचा अभाव निर्माण झाला. आजघडीला पतंग बनविणाऱ्या कारागिराला दिवसभरासाठी २०० ते ३०० रुपये दिले जातात. मात्र अन्य ठिकाणी काम केल्यावर ४०० ते ५०० रुपये रोजंदारी मिळत असल्याने कारागीर पतंग निर्मितीचे काम करायला तयार होत नाहीत. परिणामी कारागिरांचा अभाव हीदेखील एक मोठी समस्या या व्यावसायिकांना भेडसावू लागली आहे. एके काळी ५० पैशांना पतंग मिळत होता. परंतु आज तोच पतंग पाच ते सात रुपयांना मिळू लागला आहे. वाढत्या महागाईचा हा परिणाम असल्यामुळे आता हा व्यवसायच अडचणीत येऊ लागला आहे, असेही दिनेश वालिया म्हणाले.