कोल्हापूर शहरातील धोकादायक, अतिधोकादायक इमारतींचे अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेस गुरुवारपासून सुरुवात झाली. महापालिकेच्या लगतच असलेली धोकादायक इमारत सर्वप्रथम जमीनदोस्त करण्यात आली. धोकादायक इमारतींच्या मालकांना महापालिकेने पूर्व सूचना दिल्यामुळे वादाचे प्रकार फारसे झाले नाहीत. या मोहिमेत नगर अभियंता, अतिक्रमण निर्मूलन मोहिमेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पोलीस, अग्निशमन दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.    
शहरामध्ये सुमारे ८० धोकादायक इमारती आहेत. तर पंधरा ते वीस अति धोकादायक इमारती आहेत. या पडीक वास्तूंमुळे जीवितहानी होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. अलीकडे मुंब्रा येथे धोकादायक इमारत कोसळून मोठी जीवितहानी झाली होती. या पाश्र्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने धोकादायक इमारतींचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली आहे.     
महापालिकेच्या पिछाडीस बाजूस अशीच एक धोकादायक इमारत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने या इमारतीवर सर्वप्रथम हातोडा घातला. गेल्या अनेक वर्षांपासून ही इमारत हटवावी अशी मागणी होत होती. या ती जमीनदोस्त केल्यामुळे परिसरातील व्यापारी, विक्रेते, नागरिक यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
या मोहिमेबद्दल शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले की, शहरात ८० धोकादायक इमारती आहेत. त्यामध्ये पंधरा ते वीस अतिधोकादायक इमारतींचा समावेश आहे. धोकादायक इमारतींचे बांधकाम हटविण्यात यावे, अशा सूचना घरमालकांना यापूर्वीच महापालिकेने केल्या आहेत. जे जागा मालक स्वत: उतरून घेतील त्यांना महापालिकेकडून हात लावला जाणार नाही. मात्र जे निष्क्रिय राहणार आहेत, त्यांच्या इमारतींवर कारवाई केली जाणार आहे. शिवाय यासाठी अतिक्रमण निर्मूलन पथकाला येणारा खर्च घरमालकांकडून वसूल केला जाणार आहे. हा खर्च महापालिकेच्या तिजोरीत जमा होत नाही, तोपर्यंत महापालिकेचा ताबा या जागेवर राहणार आहे.