वाहनांवर प्रवेश कर आकारणीच्या गोवा राज्य शासनाच्या निर्णयाविरुद्ध महाराष्ट्रातील वाहतूकदारांनी सोमवारपासून पुन्हा असहकार्य आंदोलन सुरू केले आहे. धान्य, कडधान्य, भाजीपाला या प्रकारची वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. बांदा येथील चेकपोस्टवर सिंधुदुर्ग लॉरी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मालवाहतुकीची वाहने गोव्यात जाऊ नयेत, यासाठी गस्ती घालण्यास सुरुवात केली आहे. सुमारे २०० वाहनांतून होणारी वाहतूक आता ठप्प झाली आहे.     
गोवा राज्य शासनाने राज्यात येणाऱ्या वाहनांवर प्रवेश कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा कर अन्यायी स्वरूपाचा असल्याने तो मागे घेण्यात यावा, अशी मागणी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव, कारवार या जिल्ह्य़ातील मालवाहतूकदारांनी केली होती. या प्रश्नी तोडगा काढण्याचे आश्वासन गोवा शासनाने दिले होते. मात्र याबाबत कसल्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मालवाहतूकदारांनी गोव्याला जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेतला. त्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे.
दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटक या भागातील सुमारे २५० वाहनांतून गोव्याला वाहतूक होत असते. त्यामध्ये मुख्यत्वे करून धान्य, कडधान्ये, भाजीपाला, फळे, कटलरी साहित्य, किराणा मालाचे साहित्य आदींचा समावेश आहे. दक्षिण महाराष्ट्रासह राज्याच्या तसेच देशाच्या अन्य भागांतून होणारी मालवाहतूक रोखण्याची भूमिका कोल्हापूर लॉरी असोसिएशनने घेतली आहे. तसेच गोव्यातून येणाऱ्या वाहनांमध्ये महाराष्ट्रातून माल भरला जाणार नाही, याची दक्षताही घेतली जाणार आहे, असे लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.    
गोव्यामध्ये कसल्याही प्रकारची मालवाहतूक होऊ नये याचे नियोजन मालवाहतूकदारांनी केले आहे. त्यासाठी बांदा येथील चेकपोस्ट नाक्यावर सिंधुदुर्ग लॉरी ऑपरेटरच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गस्त घालण्यास सुरुवात केली आहे, असेही जाधव यांनी सांगितले.