केएमटीने शहरात ३१ मार्चपर्यंत पिकअप शेडस् उभारावीत, अन्यथा केएमटीचा चक्काजाम करण्याचा इशारा शनिवारी कोल्हापूर जनशक्तीने दिला आहे.
गेल्या १५ वर्षांत महापालिकेने प्रवाशांसाठी पिकअप शेडच उभारले नसून सध्या बीओटी तत्त्वावर मंजूर झालेले ३०० पिकअप शेडची उभारणी रखडल्यामुळे प्रवाशांना भर उन्हात बसची वाट पहावी लागत आहे. वारंवार आंदोलन करूनही प्रशासनाला या बाबतीत गांभीर्य नाही, असा आरोप जनशक्तीने केला आहे.    
शहरामध्ये केएमटीचे ३२ मार्ग आहेत. या मार्गावर ४४० ठिकाणी बस थांबे आहेत. परंतु सध्या फक्त १२३ ठिकाणीच पिकअप शेड अस्तित्वात असून ३२० ठिकाणी प्रवाशांना निवाऱ्याविनाच उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. शहरात राबविल्या गेलेल्या रस्ते विकास प्रकल्पात ८० पिकअप शेड काढले गेले. परंतु आयआरबी कडून फक्त १९ शेडची उभारणी करण्यात येणार असल्याचे करारात म्हटले आहे. याविरोधात २९ ऑगस्ट २०१२ रोजी कोल्हापूर जनशक्तीच्यावतीने जोरदार आंदोलन करून पिकअप शेड उभारणीच्या मागणीसाठी अतिरिक्त व्यवस्थापकांना घेराओ घालण्यात आला होता. यावेळी त्यांनी येत्या दोन महिन्यात बीओटी तत्वावर २८१ व आयआरबीकडील १९ अशी ३०० पिकअप शेड उभारण्यात येतील,असे आश्वासन दिले होते.    
या घटनेला सात महिन्याचा कालावधी उलटला तरी फक्त मध्यवर्ती बसस्थानक येथे एकच पिकअपशेड उभे करण्यात आले आहे. इतर ठिकाणी नागरिकांना उन्हाचा तडाखा झेलतच बसची वाट पहावी लागत आहे. त्यातच सध्या उभी असणारी १२३ ठिकाणची पिकअप शेडची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येत्या ३१ मार्चपर्यंत शहरातील ३०० पिकअप शेड उभारणीस सुरूवात केली नाही तर कोल्हापूर जनशक्तीच्यावतीने केएमटीचा चक्काजाम आंदोलन सुरू करण्याचा इशारा सुभाष वोरा, समीर नदाफ, रामेश्वर पत्की, अरूणअथणे, केशव स्वामी, तय्यब मोमीन यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.