औंढा नागनाथ तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील राजू मुंजाजी विभूते या तरुणाच्या आत्महत्येनंतर आदिवासी युवक कल्याण संघ व महादेव कोळी समाजात सुरू असलेल्या निर्गम उतारा खाडाखोड प्रकरणाने आता उभा संघर्ष पेटला आहे. आत्महत्या प्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी आदिवासी युवक कल्याण संघाने शुक्रवारी धरणे आंदोलन केले, तर कोळी महादेव समाजातर्फेही मंगळवारी (दि. ३) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
माजी मंत्री दशरथ भांडे, माजी आमदार अनंत तरे, नागनाथ घिस्सेवाड आदींच्या उपस्थितीत कोळी महादेव व महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष सुनील मुदीराज, संदीप मुदीराज यांनी सांगितले. दरम्यान, महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या औरंगाबाद जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आदिवासी युवक कल्याण संघाचे राज्य अध्यक्ष डॉ. संतोष टारफे व इतर सहकारी यांची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, तसेच खुनाचा गुन्हाचा दाखल करून कठोर शिक्षा द्यावी, आत्महत्या करणाऱ्या विभूतेच्या कुटुंबीयास शासकीय मदतीपोटी पाच लाख रुपये द्यावेत, कुटुंबातील एका व्यक्तीस बिनशर्त शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सपकाळ, शहराध्यक्ष सुरेश कोळी, जिल्हा सचिव संजय शेळके, जिल्हा संघटक सुनील सोनवणे आदींच्या सह्य़ा आहेत.