भाजप नगरसेवकांचे  कारस्थान असल्याचा कॉंग्रेसच्या प्रवीण पडवेकरांचा आरोप

शहर कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गजानन गावंडे यांच्या घरी शॉक लागून मरण पावलेल्या विनोद कोंडस्कर यांच्या पत्नी व आईचे उपोषण आज चौथ्याही दिवशी सुरूच आहे. या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असतांनाच गावंडे यांना बदनाम करण्यासाठी स्थायी समिती सभापती नंदू नागरकर व भाजपच्या काही नगरसेवकांचे हे कारस्थान असल्याचा आरोप कॉंग्रेसचे महासचिव प्रवीण पडवेकर यांनी केला आहे, तर या प्रकरणात नाहक गुंतवल्याने पडवेकर विरोधात ५० लाखाचा दावा ठोकणार असल्याची माहिती नागरकर यांनी दिली.
शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष गजानन गावंडे यांच्या भिवापूर येथील घराला पाणी देतांना विनोद कोंडस्कर या कार्यकत्यार्ंचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने निराधार झालेल्या पत्नी, दोन मुले व आईला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नाभिक महामंडळाने लावून धरली आहे. त्यासाठीच नाभिक समाजाने विविध आंदोलने केली, मात्र गावंडे यांनी मदत करण्याऐवजी काही नगरसेवकांना हाताशी धरून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. भीक मांगो व सामूहिक मुंडन आंदोलनानंतर आता कोंडस्कर कुटुंबीयच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. आज या उपोषण आंदोलनाचा चौथा दिवशी आहे. या उपोषणाला नाभिक समाजासोबतच भारतीय जनता पक्ष व विविध सामाजिक तसेच राजकीय संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. कोंडस्कर कुटूंबियांची मागणी न्याय असून त्यांना गावंडे यांनी तात्काळ आर्थिक मदत द्यावी, असेही या सर्वाचे म्हणणे आहे.
दोन अनाथ मुलांच्या भावी आयुष्यासाठी हे आंदोलन सुरू असतांना कॉंग्रेसचे महासचिव प्रवीण पडवेकर यांनी स्थायी समितीचे सभापती नंदू नागरकर, भाजपचे काही नगरसेवक व पत्रकारांचे हे कटकारस्थान असल्याचा आरोप केला आहे. कोंडस्कर यांचा मृत्यू गावंडे यांच्या घरी नाही, तर त्याच्या स्वत:च्या घराला पाणी देतांना झाला असावा, असेही यात म्हटले आहे.
गावंडे यांच्या विरोधात नागरकर माळी समाजाची निवडणूक हरल्यामुळे त्यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व कट आहे. पक्षाशी बेईमानी करून स्थायी समिती सभापतीपद पदरात पाडून घेणाऱ्या नागरकर व भाजपच्या काही नगरसेवकांचाही कॉंग्रेसने निषेध केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे कॉंग्रेसचे दोन गट पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत.
या आंदोलनाशी आपला काडीमात्र संबंध नाही, असे सांगतांनाच या प्रकरणाशी संबंध जोडणाऱ्या पडवेकर यांच्या विरोधात ५० लाखाचा दावा करणार, असे नागरकर यांनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. पडवेकरांचे कामधंदे काय आहेत, हे चंद्रपूरच्या जनतेला अतिशय चांगल्या तऱ्हेने माहिती आहेत.
याबद्दल अधिक काही बोलायची गरज आहे, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.