पावसाळ्यात नांदुर मधमेश्वर बंधा-यावर जसे परदेशी पक्षी पाहुणे म्हणून आपल्या भागात येतात तसेच येथील आमदाराचे झाले असून, एकदा निवडणूक झाली की पुन्हा पाच वर्षांनीच येथील मतदारांच्या गाठीभेटीसाठी ते येतात. आम्ही मात्र नित्यनेमाने जनतेची कामे करत असतानाही ते आमच्यावरच टीका करीत आहेत, असा आरोप संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केला.
तालुक्यातील गोधेगाव येथील हनुमान मंदिरासमोरील विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन कोल्हे, जिल्हा परिषद सदस्य माधवराव सोनवणे व माजी गटनेते केशव भवर यांच्या हस्ते बुधवारी पार पडले. या कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती मच्छिंद्र केकाण होते.
कोल्हे म्हणाले, माजी मंत्री शंकरराव कोल्हे सत्तेत असताना गोदावरी कालव्याच्या पाटपाण्याचा प्रश्न कधीही भेडसावला नाही. कमी झालेले पाणी वाढविण्यासाठी ते शासन दरबारी भांडले. आता मात्र धरणात पाणी असूनही ते शेतक-यांच्या शेतीला मिळेनासे झाले आहे. त्यामुळे शेतक-यांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान होत आहे. जलद कालव्यातून दहा टक्के उचलण्याची परवानगी मिळवण्यासाठी आमचा पाठपुरावा आमदाराने विधिमंडळात एकदाही तोंड उघडले नाही. पूर्व भागातील जनतेला आम्ही झुलवले असे बोलून स्वत:च्या कर्तृत्वशून्यतेचे खापरही आमच्याच माथी फोडले हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे असे कोल्हे म्हणाले.
जनाकाका शिंदे व केकाण यांचीही या वेळी भाषणे झाली. ज्ञानेश्वर रांधवणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी प्राजक्ता टेमक यांनी प्रास्ताविक केले. बाबुराव रांधवणे यांनी आभार मानले.