कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाचा जोर काहीसा कमी होऊन कायम राहिल्याने धरणातून कोयना नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग ‘जैसे थे’ ठेवण्यात आला असून, धरणाचे सहा वक्र दरवाजे  दोन फुटांवरच ठेवण्यात येऊन कोयना नदीत १७ हजार ९३४ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे, तर पायथा वीजगृहातून कोयना नदीत २ हजार १११ क्युसेक्स पाणी मिसळतच आहे. सध्या धरणात सरासरी २५ हजार ५६१ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना जलसागरात आजअखेर १०५.९५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.
आज दिवसभरात धरणाखालील कृष्णा, कोयनाकाठी पावसाच्या हलक्या-भारी सरी कोसळत आहेत. आज सायंकाळी ५ वाजता कोयना धरणाची पाणीपातळी २ हजार १६२ फूट १ इंच राहताना पाणीसाठा १०३.४१ टीएमसी म्हणजेच सुमारे ९८.२५ टक्के आहे. धरणात आवक होणारे पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात येऊन पाणीसाठा नियंत्रित ठेवला जात आहे.
आज सकाळी ८ वाजता गेल्या २४ तासात धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात २६ एकूण ३८१२ मि. मी., नवजा विभागात ३३ एकूण ४६५८ मि.मी., तर महाबळेश्वर विभागात ४५ एकूण सर्वाधिक ४७७६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर दिवसभरात कोयनानगर विभागात २१, नवजा विभागात ४६, तर महाबळेश्वर विभागात ३० मि. मी. पाऊस कोसळला आहे.
यंदा गतवर्षीच्या तुलनेत ७७.१० टक्के पाऊस झाला आहे. धरण क्षेत्रात सरासरी ४४१५.३३ मि. मी. पाऊस झाला असून, गतवर्षी हाच पाऊस ५७२६.३३ मि. मी. नोंदला गेला आहे.
आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कराड तालुक्यात सरासरी १.७३ तर एकूण ३४९.७६ मि. मी. तसेच पाटण तालुक्यात ८.८८ तर एकूण १५६७.५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक पाटण तालुक्यातील नवजा विभागात ४६५८ मि. मी., तर सर्वात कमी कराड तालुक्यातील शेणोली विभागात २५६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.