कोयना धरण क्षेत्रात धो-धो पावसाचा अतिरेक कायम राहिल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे दहा फुटांवरून आज सकाळी साडेअकरा वाजता साडेबारा फुटांपर्यंत उचलून कोयना नदीपात्रात एकंदर ६२ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मोठय़ाप्रमाणात होत असलेल्या या विसर्गाबरोबरच धरणाखालील कराड व पाटण तालुक्यात पावसाची संततधार अखंड सुरू असल्याने कृष्णा, कोयना नद्यांच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत असून, या नद्या पूरसदृश्य स्थितीत वाहत आहेत. परिणामी संभाव्य पूरस्थिती गांभीर्याने घेऊन प्रशासन सतर्क आहे. नदीकाठच्या जनतेला यापूर्वीच दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, सध्या अगदीच नदीकाठावरील कुटुंबांचे स्थलांतर करण्यात येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच पाणीसाठवण प्रकल्प तुडुंब भरले असून, बहुतांश प्रकल्पावरून पाणी वाहत आहेत. चालू हंगामात गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळ कोसळणाऱ्या सततच्या पावसाने खरिपाच्या हंगामावर ओल्या दुष्काळाची छाया असून, शेतकरी वर्ग हवालदिल आहे. कोयना धरणात आवक होणाऱ्या पाण्याचे प्रमाण प्रतिसेकंदास सुमारे ८० हजार क्युसेक्स असताना, सध्या मात्र, ६२ हजार क्युसेक्स पाण्याचा कोयना नदीत विसर्ग करण्यात येत असल्याने धरणाचे दरवाजे आणखी काही फुट उचलून नदीपात्रातील पाण्याचा विसर्ग वाढवणे अपरिहार्य असल्याचे धरण व्यवस्थापनाचे शाखा अभियंता ओ. बी. पुजारी यांनी सांगताना, याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.
चालू हंगामात कोयना धरणामध्ये जवळपास ७६ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत गेल्या ३५ तासांत धरण क्षेत्रातील कोयनानगर विभागात २३५ एकूण ३,२०८, महाबळेश्वर विभागात २३१ एकूण ३,५९० तर, नवजा विभागात सर्वाधिक ३२२ एकूण ४,००९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाचे दरवाजे साडेबारा फुटापर्यंत उचलले असले तरी कोयना नदीत विसर्ग होणाऱ्या पाण्यापेक्षाही आवक पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने धरणाच्या पाणीपातळीत ८ इंचाने तर, पाणीसाठय़ात जवळपास १ टीएमसीने वाढ झाली आहे. सध्या धरणाची पाणीपातळी २,१५० फुट ८ इंच राहताना पाणीसाठा ८८.७५ म्हणजेच सुमारे ८५ टक्के आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे धरणाचे दरवाजे आणखी काही फुट उचलून धरणातून कोयना नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार असल्याचे धरण व्यवस्थापनाचे शाखा अभियंता ओ. बी. पुजारी यांनी सांगितले.