भगवद्गीतेचा अभ्यास करणाऱ्या २१ विद्यार्थ्यांनी ७०० श्लोकांची भगवद्गीता तोंडपाठ केली आहे. या सर्व गीता अभ्यासकांनी शृंगेरीच्या शंकराचार्याच्या वेदपाठ शाळेत जाऊन गीता पठणाची परीक्षा उत्तम रीतीने दिल्याने या २१ शिष्योत्तमांचे शंकराचार्यानी एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मान केला आहे. विशेष म्हणजे या गीताध्यायींमध्ये तीन शाळकरी विद्यार्थी आहेत.
‘फळाची अपेक्षा न धरता फक्त कर्म करीत राहा’ या एकाच ध्यासाने हे सर्व विद्यार्थी भगवद्गीतेचे पठण करीत होते. डोंबिवली, ठाणे, दादर येथील हे सर्व यशस्वी विद्यार्थी आहेत. अपेक्षा न करता गेले तीन ते चार वर्षांपासून हे सर्व विद्यार्थी गीता पठणाच्या वर्गात येत होते.
राजापूर येथील हर्डीच्या श्री गोविंदानंद सरस्वती न्यासाच्या माध्यमातून डोंबिवली, कल्याण, ठाणे आणि दादर भागात भगवद्गीता पठणाचे नि:शुल्क वर्ग गेले सहा वर्षांपासून घेतले जातात. ‘जीवनाचे सार गीतेमध्ये आहे. गीतेप्रमाणे प्रत्येकाने आचरण केले तर कोणतीही समस्या उद्भविणार नाही’ या विचारातून दिवंगत वामन गणेश नवरे यांनी पाच वर्षांपूर्वी डोंबिवलीत गीता पठणाचे वर्ग सुरू केले. त्यानंतर अन्य भागात नागरिकांच्या मागणीप्रमाणे हे वर्ग सुरू करण्यात आले. वय वर्ष ५ ते ८० वर्षांपर्यंतचे नागरिक या गीता पठण वर्गात नियमितपणे येतात. डोंबिवलीत आता १३ गीता पठण वर्ग आहेत. सुमारे सहाशे ते सातशे शिष्य विविध वर्गामधून गीत पठण करीत आहेत.
श्वेता म्हात्रे, रोहित म्हात्रे, धारिणी फणशीकर या शाळकरी विद्यार्थ्यांनी संपूर्ण गीता पाठ केली आहे. याशिवाय माधुरी भिरूड, वामन आपटे, प्रतिभा काशीद, अश्विनी दामले, प्रतिभा शेवडे, मेघना कोल्हटकर, लक्ष्मण खांडेकर, सुधा भोसेकर, उषा भिडे, भाग्यश्री कारले, मालती धारप, वीणा काटे, छाया यादव, सीमा नाफडे, श्रीकांत शेवडे, कुंदा कुलकर्णी, प्रतिभा पाटील, रामचंद्र कुलकर्णी यांनी गीतेचे पठण केले आहे. त्यांना शंकराचार्याच्या हस्ते पारितोषिक आणि मानपत्र देण्यात आले.
या गीता पठण वर्गांचे विश्वास नवरे, डॉ. विनिता केतकर, शुभांगी पुसाळकर, रेखा उटगीकर व इतर गीताव्रती नियोजन करतात.
 परीक्षा पद्धत
शंकराचार्याच्या उपस्थितीत शृंगेरी येथे गीताध्यायींची तोंडी परीक्षा घेतली जाते. मध्येच श्लोकाचा शब्द गुरुजींकडून विचारल्यानंतर त्याची पुढील सुरुवात विद्यार्थ्यांने करायची असते. बिनचूक गीता पठण करणाऱ्यांना शंकराचार्याकडून २१ हजाराचे बक्षीस दिले जाते. गीता पठणात चुका करणाऱ्यांना त्यापेक्षा कमी म्हणजे १८ हजार, १५ हजार रुपये प्रमाणात पारितोषिके दिली जातात. डोंबिवलीतील ११ जणांनी बिनचूक गीता पठण केले, त्यांना २१ हजार रुपये, ९ जणांना १८ हजार तर २ जणांना १५ हजाराची बक्षिसे मिळाली आहेत. एखाद्या भागात १५ ते २० नागरिकांचा संघ तयार झाला की तेथे गीता पठण वर्ग सुरू केला जातो. संपर्क, पुसाळकर ९२२४३२७००५, उटगीकर ९३२३८३०९६९.
 श्वेता, रोहितची भरारी
श्वेता म्हात्रे डोंबिवलीतील स. ह. जोंधळे विद्यालयात इयत्ता नववीत शिक्षण घेत आहे. इयत्ता चौथीपासून ती वामन नवरे यांच्याकडे गीता पठणासाठी जात असे. सहाध्याय मुखोद्गत झाल्यानंतर तिने शृंगेरी येथे परीक्षा दिली होती. त्या वेळी तिला शंकराचार्याकडून सात हजार रुपये आणि सोन्याचे सन्मानचिन्ह मिळाले होते. यापुढे आपण गीतेचा अर्थ समजून घेण्याचा अभ्यास करणार आहोत, असे श्वेताने सांगितले. रोहित म्हात्रे हा साऊथ इंडियन शाळेत इयत्ता आठवीत आहे. त्यानेही सहाध्याय पाठांतर करून शृंगेरी येथे पाच हजारांचे पारितोषिक पटकावले आहे.