वाई तालुक्यातील पाणी फलटणला पळवून जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाई तालुक्याला पाणी पुरवण्यासाठी मंजूर योजना मोडीत काढल्यामुळेच वाई तालुक्यात दोन-दोन धरणे असूनही दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रदीप क्षीरसागर यांनी केला आहे.
वाई तालुक्यात धोम व बलकवडी ही दोन धरणे आहेत. या धरणातून पाणी पुरवण्यासाठी न्यायिक तत्त्वाने तालुक्यालाच प्राधान्य मिळायला हवे होते. मात्र आजपर्यंतच्या विविध मंत्रिमहोदयांनी मुख्यत: पालकमंत्री रामराजे निंबाळकर यांनी तालुक्याला प्रवाही व उपसा सिंचन योजनांतून पाणी मिळवण्यासाठी प्रस्तावित केलेल्या सर्व योजना मोडीत काढल्यानेच या योजनांचा खर्च वाढला. या योजनांना मंजुरी मिळाली. कामेही सुरू झाली, पण रामराजे यांनी या कामांना निधी उपलब्ध होऊ दिली नाही. येथे पाणी दिसत असूनही माणसांना, जनावरांना आणि शेतीला पाणी मिळत नाही.
कवठे केंजळ उपसा सिंचन योजना बलकवडी धरणाबरोबरच सुरू झाली. बलकवडी धरणाला निधी मिळाला ते धरण पूर्ण झाले. धोम धरणाजवळ बोगदा पाडून कालवे काढून फलटणला पाणी पळवले. परंतु कवठे केंजळ योजनेला पैसे नाहीत म्हणून योजना रखडली आहे. केवळ वीस ते पंचवीस टक्केच काम पूर्ण झाले असून सुरुवातीला ४२ कोटींची योजना ६५ कोटींवर आणि आता ८३ कोटींवर पोहोचली आहे.
या योजनेसाठी ताबडतोबीने निधी उपलब्ध करून दिला नाहीतर फलटणला जाणारे पाणी बंद करू, प्रसंगी कॅनॉल अडवू आणि वेळ आलीच तर कॅनॉल फोडू, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.