डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय पांढरीपांडे ‘धृतराष्ट्रा’च्या भूमिकेत असून राजकीय सोयीचे निर्णय घेत आहेत. विद्यापीठ प्रशासनास विशिष्ट राजकीय पक्षांचे नेते व कार्यकर्तेच विचारवंत वाटावे, ही खेदाची बाब असल्याचे अधिसभा सदस्य प्रा. गजानन सानप यांनी म्हटले आहे. कुलगुरूंना अव्यवस्थेविषयी पाठविलेल्या दुसऱ्या पत्रात ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दोन वर्षांपूर्वी कुलगुरुपदाचा पदभार स्वीकारणारे डॉ. पांढरीपांडे विद्यापीठातील निर्णय दुसऱ्याच्या सांगण्यावरून घेत असल्याचे प्रा. सानप यांनी म्हटले आहे. विद्यापीठात होणारे कार्यक्रम शैक्षणिक किती व राजकीय किती याची कारणमीमांसा होण्याची वेळ आली आहे. राजकीय महामंडळाप्रमाणे विविध खात्यांचे व समित्यांचे सोयिस्कर वाटप केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. परंतु यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
संघटनांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनाबाबतीतही दुजाभाव केला जात असल्याचे प्रा. सानप यांनी म्हटले आहे. विद्यापीठ प्रशासनातील कर्मचारी, अधिकारी, प्रशासन व प्राध्यापकांमधील विसंवाद टोकाला गेला आहे. त्यामुळे विद्यापीठ राजकारणापासून दूर ठेवावे, अशी विनंती प्रा. सानप यांनी केली आहे.