News Flash

कुंभमेळ्यात पर्यटनविकास साधण्याची संधी

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात सर्वकाही उपलब्ध असताना या पर्यटन स्थळांकडे आतापर्यंत दुर्लक्षच करण्यात आले असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील

| September 27, 2014 01:53 am

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी शहरासह जिल्ह्यात सर्वकाही उपलब्ध असताना या पर्यटन स्थळांकडे आतापर्यंत दुर्लक्षच करण्यात आले असून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासाकडे नितांत लक्ष देण्याची गरज येथील अखिल भारतीय पर्यटन व वाहतूक संघटनेचे अध्यक्ष दिलीपसिंग बेनिवाल यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये पर्यटन सुविधा केंद्र, नाशिक पर्यटन विकास समिती तयार करावी, नाशिकचे आकर्षक माहितीपत्रक तयार करावे, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेतर्फे स्वतंत्र पर्यटन विभाग व कर्मचारी नेमण्यात यावेत अशा सूचनाही बेनिवाल यांनी केल्या आहेत.
दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिक व त्र्यंबकेश्वरची महती संपूर्ण देशात आहे. नाशिक केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर, निसर्गमय व आल्हाददायक हवामानामुळे पर्यटकांना भावते. मात्र त्याचा सर्वागीण विकास झालेला नाही. पर्यठन संस्कृती शहर व जिल्ह्यात विकसित झालेली नाही, हे कटू सत्य असल्याचे बेनिवाल यांनी नमूद केले आहे. औद्योगिकीकरण आणि बेसुमार वृक्षतोड यामुळे नाशिकच्या तापमानाचा पारा दरवर्षी उन्हाळ्यात ४२ अंशावर पोहचतो. नाशिकरोड-देवळाली परिसरात अनेक पुरातन सॅनेटोरियम आहेत. पांडवलेणीप्रमाणे २५ पेक्षा अधिक लेणी नाशिकमध्ये आहेत. राज्यातील एक तृतीयांश किल्ले जिल्ह्य़ात आहेत. कळसूबाई, अलंग-कुलंग, मंदनगड, ब्रह्मगिरी, हरिहर, सप्तश्रंग, रामशेज, साल्हेर-मुल्हेर, मांगी-तुंगी हे किल्ले नाशिकचे वैभव आहेत. नाशिक जिल्हा धरणांचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. अनेक धरणांमध्ये जलक्रीडा प्रकार खेळले जाऊ शकतात. त्याव्दारे त्या त्या परिसरात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते. वाईन खोऱ्यामुळे कृषी पर्यटनाला उभारी येईल. आदिवासी पाडय़ांवरची संस्कृती, त्यांचे सण, उत्सव, नृत्य, वाद्य, त्यांची खाद्य संस्कृती, वारली चित्रकलेसारखी जगभरात लोकप्रिय आहे. त्यांचे दर्शन पर्यठकांना जिल्ह्यात होऊ शकते.
दुगारवाडीसारखे धबधबे, नांदुरमध्यमेश्वरचे पक्षी अभयारण्य यांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. स्थानिकांना पर्यटन संस्कृतीची जाणीव करून दिल्यास वाहनतळ, मार्गदर्शक, खानावळ यांच्या माध्यमातून त्यांनाही रोजगार मिळू शकतो. याशिवाय नाशिकमध्ये पर्यटन सुविधा केंद्र, नाशिक पर्यटन विकास समिती यांची निर्मिती करण्याची गरज आहे. नाशिकमध्ये प्रशिक्षित मार्गदर्शकांची (गाईड) कमतरता आहे. त्यासाठी प्रशिक्षण वर्ग घेण्याची गरज आहे. कुंभमेळ्यात किमान दोन हजार मार्गदर्शकांची आवश्यकता भासेल. त्यासाठी ऑटोरिक्षांसह अन्य वाहनांचे चालक, विद्यार्थी यांना प्रशिक्षण दिले जाऊ शकते.
नाशिक नगरी पर्यटन नगरी होण्यासाठी हवाई प्रवासी सेवा त्वरीत सुरू होणे आवश्यक आहे. शहरात पूर्वीच्या अनेक धर्मशाळा असल्या तरी पर्यटकांना राहण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेल्या हॉटेल्स व लॉजची संख्या कमी आहे. नाशिकचा पर्यटन नकाशा व संपूर्ण माहितीपुस्तक महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आणि नाशिक महानगरपालिकेने प्रकाशित करून रेल्वे  व बस स्थानकांवर ठेवावे. टीव्ही, समाज माध्यम, वृत्तपत्र यांव्दारे नाशिकची पर्यटनात्मक अशी प्रसिध्दी मोहीम राबविण्यात यावी, ‘टुरिझम नॉलेज सिटी’ सारखी संकल्पना प्रत्यक्षात राबवावी, पर्यटन मित्र पुरस्कार दरवर्षी देण्यात यावेत, अशा सूचना बेनिवाल यांनी केल्या आहेत.
नाशिक दर्शनसाठी केवळ पर्यटकांना विशेष वाहन मिळाले पाहिजे, पर्यटनासाठी टोल फ्री नंबर सेवा उपलब्ध करावी, महानगर पलिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये पर्यटकांसाठी एकजरी प्रेक्षणीय स्थळ झाले तर वॉर्डाचा विकास होऊ शकेल. १०० किलोमीटर परिसरात ‘राऊंड परमीट’ खासगी वाहनांसाठी परिवहन विभागने दिले पाहिजे. रामकुंडावर रोज सायंकाळी गंगा आरती करण्याची आवश्यकता आहे. पर्यटनाला महत्व दिल्यास शहराचा विकास झपाटय़ाने होणे शक्य आहे. एक पर्यटक आल्यास ७० ते ८० लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. नाशिकमध्ये पर्यटन अभ्यासक्रम विविध महाविद्यालयांमध्ये सुमारे १५० विद्यर्थी दरवर्षी शिकतात. परंतु रोजगारासाठी त्यांना पुणे, मुंबई, अहमदाबाद, जयपूर, दिल्ली किंवा केरळ अशा ठिकणी जावे लागते. नाशिकचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाल्यास स्थानिकांना शहरातच रोजगाराची संधी मिळू शकेल. प्रशिक्षित अशा विद्यार्थ्यांकडून शहराच्या पर्यटनास निश्चितच चालना मिळू शकेल, असा आशावाद बेनिवाल यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2014 1:53 am

Web Title: kumbh mela an opportunity for tourism development
टॅग : Kumbh Mela
Next Stories
1 नागरी सहकारी बँकांच्या समस्यांवर मंथन
2 अर्जाचा महापूर आणि यंत्रणेची दमछाक
3 सर्वसामान्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रवेश बंद’
Just Now!
X