News Flash

कुंभमेळा; आपत्ती व्यवस्थापन जनजागृती पोवाडय़ांपासून ते जिंगल्सपर्यंत

गतवेळच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे ‘आपत्ती व्यवस्थापन’ हा आगामी कुंभात कळीचा मुद्दा ठरणार असल्याने जिल्हा प्रशासनाने जनजागृतीसाठी लोकगीते, पोवाडे व पथनाटय़ या पारंपरिक पद्धतींबरोबर

| April 3, 2013 02:20 am

गतवेळच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे ‘आपत्ती व्यवस्थापन’ हा आगामी कुंभात कळीचा मुद्दा ठरणार असल्याने जिल्हा प्रशासनाने जनजागृतीसाठी लोकगीते, पोवाडे व पथनाटय़ या पारंपरिक पद्धतींबरोबर प्रथमच संकेतस्थळ, एसएमएस, जिंगल्स, व्हिडिओ जिंगल्स अशा आधुनिक तंत्राचा वापर करण्याचे नियोजन केले आहे. तसेच या स्वरूपाची परिस्थिती कौशल्यपूर्वक हाताळण्यासाठी ‘इमर्जन्सी ऑपरेटींग सेंटर’ची स्थापनाही करण्यात येणार आहे. प्रथमोपचार पद्धती, शोध व बचाव, आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाची भूमिका या विषयांवर तब्बल ५२ हजार नागरिकांना प्रशिक्षणाचे लक्ष्य ठेवतानाच शालेय आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळांच्या माध्यमातून ५० शाळांतील विद्यार्थ्यांनाही त्यात सामावून घेतले जाईल.
आगामी सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या दोन वर्षांवर येऊन ठेपल्याने प्रशासनाकडून विकास कामांना गति देण्यासाठी धडपड सुरू आहे. कुंभमेळ्यात पवित्र स्नानाचा योग साधण्यासाठी देश विदेशातील लाखो भाविक नाशिक व त्र्यंबकेश्वर नगरीत गर्दी करतात. मागील कुंभमेळ्यात शाही मिरवणुकीच्या वेळी लाखो भाविकांच्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन न झाल्यामुळे चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले होते. त्यात जवळपास ३३ भाविकांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी, एकाच ठिकाणी होणारी लाखो भाविकांची गर्दी, ही खरी चिंतेची बाब ठरते. यामुळे घडू शकणाऱ्या संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गर्दीचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यात उद्भवू शकणाऱ्या अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने २८ कोटी ३० लाख रूपयांचा प्राथमिक आराखडा तयार केला आहे. आराखडय़ातील कोणत्या बाबींना शासन मान्यता देते, यावर आपत्ती व्यवस्थापनाची भिस्त अवलंबून असली तरी आगामी सिंहस्थात नाशिककरांना सजग राखण्याच्या दृष्टीकोनातून वेगवेगळे प्रयोग केले जाणार आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमांची साथ जिल्हा प्रशासनास मिळणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या जवळपास ५० लाख मार्गदर्शन पुस्तिका आणि सुमारे दहा हजार कुंभमेळा मार्गदर्शक नकाशे, हस्तपत्रिकांची निर्मिती करण्याचे नियोजन आहे. प्रशिक्षण व कार्यशाळांच्या माध्यमातून हजारो स्वयंसेवक निर्माण करण्यात येणार आहे. स्वयंसेवक, पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, एनसीसी, एनएसएस आदींना प्रथमोचार प्रशिक्षण दिले जाईल. स्नानाप्रसंगी भाविक पाण्यात बुडण्याचीही शक्यता असते. हे लक्षात घेऊन शोध व बचाव पथकाची निर्मिती केली जाणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विभागाची भूमिका व करावयाच्या उपाययोजना, शालेय आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.सिंहस्थ कुंभपर्वासाठी खास इमर्जन्सी ऑपरेटींग सेंटरची स्थापना केली जाणार आहे. त्र्यंबकेश्वर व नाशिक या ठिकाणी ही व्यवस्था कार्यान्वित करताना वॉकीटॉकी, मोबाईल सेवा पुरविताना विशेष संकेतस्थळाची निर्मिती आणि एसएमएस ब्लास्टरची व्यवस्था केली जाईल. एमएसएसच्या माध्यमातून लाखो भाविक व शहरवासीयांना सावधगिरीबाबत माहिती देण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. या शिवाय, जनजागृतीसाठी अफलातून संकल्पना साकारल्या जाणार आहेत. त्यात चित्रफित, जिंगल्स, लोकगिते, पोवाडे, पथनाटय़, कॉमिक्स तयार करणे, छोटय़ा कार्टून पुस्तिका, व्हिडिओ जिंगल्स, भिंत्तपत्रके, फलक, व्हिडिओ फ्लोट आदींचा समावेश आहे. शोध व बचावासाठी अग्निशमन यंत्रणा व रेस्क्यु बोटची खरेदी, लाईफ जॅकेट्स व लाईन रिंग, रोप यांसारख्या संरक्षणात्मक साहित्याची खरेदी, फॅक्स यंत्रणा, जनरेटर, संगणक, वॉकीटॉकी आदीं आवश्यक त्या प्रमाणात घेण्याचे नियोजन आहे. एकुणात, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात आपत्कालीन कक्ष सर्व दृष्टीने सज्ज राहील, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:20 am

Web Title: kumbh mela disaster management awareness
Next Stories
1 गुणदानाचा अंतिम निर्णय जिल्हाबा समितीचा
2 छोटय़ा संमेलनांमधून मूल्यांची रुजवण – डॉ. कोतापल्ले
3 ‘चणकापूर कालवा प्रश्नी सर्वानी एकत्रित येण्याची गरज’
Just Now!
X