मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात पर्वणीच्या कालावधीत म्हणजे दोन महिन्यांत देशभरातून नाशिकसाठी तब्बल ३२५ रेल्वे सोडण्यात आल्या होत्या. आगामी सिंहस्थात ही संख्या किती रेल्वे गाडय़ांची असेल, किती प्रवासी रेल्वेने प्रवास करतील, त्यांची येण्याची व जाण्याची व्यवस्था कुठे व कशी राहणार आदी मुद्दय़ांवर रेल्वे प्रशासनाने महिनाभरात आराखडा सादर करावा, असे निर्देश पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांनी दिले. विविध शासकीय विभागांकडून सिंहस्थाशी संबंधित नियोजन आराखडे सादर झाले असले तरी रेल्वे प्रशासन त्यास अपवाद ठरला आहे. रेल्वेच्या माध्यमातून किती प्रवासी कुंभमेळ्यात सहभागी होऊ शकतील यावर एसटी महामंडळाच्या बसेसचे नियोजन अवलंबून आहे. रेल्वेकडून त्याची माहिती मिळेपर्यंत एसटी बस नियोजनाचा विषयही अधांतरी राहू शकतो. ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महिनाभरात संबंधित आराखडा सादर करावा असे सूचित करण्यात आले. तसेच प्रवासी सुविधांच्या अनुषंगाने नाशिकरोड रेल्वे स्थानक परिसराचे रेल्वे, पोलीस, महसूल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेक्षण करण्यात आले.
वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, पोलीस आयुक्त कार्यालयाने सोमवारी रेल्वे प्रशासनासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. पोलीस आयुक्त सरंगल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विलास पाटील, एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंहस्थाच्या अनुषंगाने रेल्वे प्रशासनाच्या तयारीवर चर्चा करण्यात आली. आगामी सिंहस्थासाठी रेल्वे प्रशासन किती विशेष गाडय़ा सोडणार आहेत, याची अद्याप निश्चिती झालेली नाही. मागील सिंहस्थात ६० दिवसांत देशभरातून जवळपास ३२५ रेल्वे गाडय़ा नाशिकसाठी सोडण्यात आल्या होत्या. यंदा ही संख्या किती असेल याची विचारणा सरंगल यांनी केली. त्याची स्पष्टता अद्याप झाली नसल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  रेल्वेकडून सिंहस्थ काळात सोडल्या जाणाऱ्या विशेष रेल्वेगाडय़ांची स्पष्टता होत नाही, तोवर एसटी महामंडळाचे पुढील नियोजन रखडणार आहे. एका रेल्वेगाडीने आलेल्या प्रवाशांना शहरात नेण्यासाठी सर्वसाधारणपणे ४० एसटी बसेसची गरज भासेल. रेल्वेगाडय़ांची माहिती मिळेपर्यंत हे नियोजन करणे अवघड असल्याचे निदर्शनास आले. सिंहस्थासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी एक तर नाशिकहून परतणाऱ्या भाविकांसाठी एक याप्रकारे दोन रेल्वे स्थानकांचा वापर करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. नाशिकरोड व ओढा या दोन रेल्वे स्थानकांपैकी कोणत्या बाबीसाठी कोणत्या स्थानकाचा वापर करावयाचा याची निश्चिती झालेली नाही. ओढा स्थानकावर पत्राच्या शेडवगळता अन्य सुविधांची उपलब्धता नाही. या रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने काय काय उपाय करता येतील याचे सर्वेक्षण करण्याचे सूचित करण्यात आले. महिनाभरात रेल्वेने आपला आराखडा सादर करावा, असे सरंगल यांनी सांगितले. बैठकीत सूचित केल्याप्रमाणे सायंकाळी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकास भेट देऊन पाहणी केली. त्याचा अहवाल पुढील बैठकीत सादर केला जाईल.
एका रेल्वेगाडीसाठी ४० बसेसची निकड
सर्वसाधारणपणे एका रेल्वे गाडीत अडीच ते तीन हजार प्रवासी प्रवास करू शकतात. एकाच रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या या प्रवाशांना शहरात आणण्यासाठी किमान ४० एसटी बसेसची आवश्यकता लागणार आहे. सिंहस्थ काळात रेल्वेकडून नाशिकसाठी कशा व किती गाडय़ा सोडल्या जातील याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर त्या अनुषंगाने एसटी बसेसचे नियोजन करता येईल. गत वेळी सिंहस्थ काळात ३२५ रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या होत्या. यंदा त्यात वाढ होणार असली तरी रेल्वेगाडय़ांची नेमकी संख्या स्पष्ट झालेली नाही. परिणामी, एसटी महामंडळास पुढील नियोजन करणेही अवघड झाले आहे.
आपत्कालीन आराखडय़ावर मंथन
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर, प्रत्येक शासकीय विभागाकडून आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करवून घेतला जाणार आहे. पोलीस यंत्रणेने बैठकीत आपला आराखडा सादर करून इतर विभागांनी तो कशा पद्धतीने तयार करावा, याची माहिती दिली. आराखडय़ात एखादी आपत्ती घडल्यानंतर नेमकी काय कार्यवाही करावी, हे सविस्तरपणे नमूद करण्यास सांगण्यात आले आहे.