मध्य रेल्वेमार्गावरील गुन्हेगारीप्रवण मानल्या जाणाऱ्या मुलुंड ते कुर्ला या स्थानकांदरम्यानची सुरक्षा सांभाळणाऱ्या कुर्ला रेल्वे पोलिसांचा जीव गेली तीन वर्षे कमालीच्या धोक्यात आहे. गेली तीन वर्षे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याची इमारत बांबूंच्या टेकूवर उभी असून भिंतींना भयप्रद तडे गेले आहेत. ही इमारत रेल्वेमार्गाला लागूनच असल्याने दर चार मिनिटांनी एक गाडी जाताना इमारतीला हादरे बसतात. त्यामुळे या पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या ८० ते ९० रेल्वे पोलिसांचा जीव सदैव टांगणीला असतो. रेल्वे प्रशासनाच्या अभियंता विभागानेही ही इमारत धोकादायक असल्याचे स्पष्ट केले आहे. डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेनंतर तरी रेल्वे प्रशासन कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या या वाताहतीकडे लक्ष देईल, अशी अपेक्षा आहे.
कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात सध्या ८०-९० पोलीस एका वेळी कार्यरत असतात. त्याशिवाय ८-१० आरोपीही असतात. एवढय़ांना सामावून घेणारी पोलीस ठाण्याची इमारत मात्र गेली तीन वर्षे बांबूच्या टेकूवर उभी आहेत. इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. आरोपींच्या कोठडीला, महिला कर्मचाऱ्यांच्या खोलीला तडे गेले आहेत. ही इमारत रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येत असल्याने कुर्ला रेल्वे पोलिसांनी याआधी अनेकदा रेल्वे प्रशासनाला इमारतीच्या परिस्थितीबद्दल कळवले. मात्र रेल्वे प्रशासन अद्याप उदासीन आहे.
महिनाभरापूर्वी मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी कुर्ला रेल्वे स्थानकाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान कुर्ला रेल्वे पोलिसांनी त्यांना रेल्वे पोलीस ठाण्याच्या दुरवस्थेबद्दल सांगितले. मात्र तरीही रेल्वे प्रशासनाने या इमारत दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचललेले नाही.
विशेष म्हणजे रेल्वे प्रशासनाच्या अभियंता विभागानेही ही इमारत धोकादायक असल्याचा अहवाल सादर केला आहे. तरीही गेल्या तीन वर्षांत याप्रकरणी योग्य पावले उचलण्यात आलेली नाहीत. रेल्वे पोलीस हे राज्य सरकारचे कर्मचारी असल्याने रेल्वे प्रशासनाकडून त्यांना नेहमीच दुय्यम वागणूक मिळते. त्याचाच परिपाक म्हणून आमच्या पोलीस ठाण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, अशी खंत पोलीस कर्मचारी व्यक्त करतात. आता डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर तरी या पोलीस ठाण्याचा कायापालट होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.