कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळांकडे शाळा व्यवस्थापन आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे विज्ञान विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जाणीवा फारशा विकसित होत नसल्याने संशोधन आणि नैसर्गिक विज्ञान शिकण्यास साहजिकच विद्यार्थ्यांचा कल नसतो. प्रयोगशाळेतील पाहिजे त्या सुविधा कनिष्ठ महाविद्यालयांत मिळत नाहीत. केवळ प्रात्यक्षिकांच्या गुणांसाठी उरलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांत त्याही सुविधा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी व पालकांनाही त्याची खंत नाही आणि शाळा व्यवस्थापनांना त्यात सुधार करायचा नाही, असे दबक्या आवाजात काही प्राचार्य आजही सांगतात.
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे मिळून ८५० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यापैकी ६५५ अनुदानित, ५० विना अनुदानित आणि १३९ कायम विना अनुदानित महाविद्यालये आहेत. नागपूर जिल्ह्य़ात सर्वात जास्त २१५ अनुदानित, १२ विना अनुदानित आणि ३१ कायम विना अनुदानित महाविद्यालये आहेत. विज्ञान शाखेच्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या २७०च्यावर आहे. त्यातील जवळपास १५० कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळा ठिकठाक आहेत. तर जवळपास अध्र्या महाविद्यालयांतील प्रयोगशाळांमध्ये साधन सुविधांचा दुष्काळ आहे. विद्यार्थ्यांना कधीकधी प्रयोगशाळेत प्रवेश मिळतो. उपकरण असल्याचे लांबून दिसतात मात्र, ते सुरुच होत नाहीत. रसायने खराब झालेली असतात किंवा कित्येकदा महागडी रसायने उपलब्धच नसल्याने विद्यार्थ्यांना प्रयोग करता येत
नाहीत.  अनुदानित महाविद्यालयात प्रयोगशाळांची दुरावस्था आहे. काही कायम विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांत तर प्रयोगशाळांच्या केवळ पाटय़ा आहेत. त्यामुळे प्रात्यक्षिक अन्य महाविद्यालयांत घेतले जाते. प्रात्यक्षिक परीक्षांच्यावेळी बाहेरून येणाऱ्या परीक्षकांना ‘मॅनेज’ केले जाते. अकरावी व बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेव्यतिरिक्त वर्षभर प्रात्यक्षिक करावी लागतात. मात्र, सुविधाच नसल्याने विद्यार्थी प्रात्यक्षिक करणार कसे. तरीही विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षेचे २० पैकी १८-१९ गुण मिळतात. केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचीच अशी अवस्था आहे असे नाही तर नागपूर शहरातील अनेक कनिष्ठ महाविद्यालयांत प्रयोगशाळांची दुरावस्थाच आहे. त्यामुळेच बारावी होऊन विद्यार्थी बी.एस्सी.च्या प्रथम वर्षांत प्रवेश घेतात तेव्हा त्यांना प्रयोगशाळेची आणि त्यातील उपकरणांची माहिती नसते. दीड वर्षांपूर्वी राज्याच्या परीक्षा मंडळाच्या अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांनी प्रयोगशाळांमधील असुविधांमुळे शाळा व्यवस्थापनांवर कारवाईचे संकेत दिले होते, तेव्हा व्यवस्थेत सुधार होईल, अशी अपेक्षा होती. अद्याप तरी अशी पावले उचलली गेली नाहीत.