धुळे लोकसभा मतदारसंघात आघाडीचे उमेदवार आ. अमरीश पटेल यांचा लागोपाठ दुसऱ्यांदा झालेला पराभव प्रचारातील गणित कुठेतरी चुकत असल्याची जाणीव करून देणारा आहे. सिंचनाच्या अभिनव पध्दतींव्दारे शिरपूर तालुक्यातील दुष्काळ कायमचा हटविणाऱ्या पटेल यांना जिल्ह्यातील मतदार दूर लोटण्याची अनेक कारणे असून निवडणुकीव्यतिरिक्त जिल्ह्याच्या ग्रामीण भागाकडे ढुंकूनही न पाहाणे हे एक महत्वपूर्ण कारण लागोपाठच्या पराभवांमागील असल्याचे मानले जात आहे.
पटेल हे विधानसभेसाठी ज्या शिरपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. तो लोकसभेसाठी धुळे नव्हे तर, नंदुरबार मतदारसंघात समाविष्ट आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पटेल यांना आपल्या हक्काच्या मतांना मुकावे लागते. लोकसभेसाठी उमेदवारी करताना त्यांना आघाडीच्या इतर नेत्यांवर अवलंबून राहण्याशिवाय गत्यंतरच राहात नाही. मानापमानाच्या राजकारणात स्वत:चे महत्व वाढवून घेण्यासाठी सदोदित प्रयत्नरत असलेले नेते या संधीचा पुरेपूर लाभ उठवित असल्याचे पटेल पराभूत झालेल्या दोन्ही निवडणुकांदरम्यान दिसून आले. मागील निवडणुकीत माजी मंत्री रोहिदास पाटील यांचा रूसवा शेवटपर्यंत कायम राहिला. तर, यावेळी बागलाण येथे आघाडीच्या नेत्यांमधील बेबनाव पटेल यांना स्वत:च्या डोळ्यांनी पाहावा लागला.
पटेल हे निवडणूक संपल्यानंतर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फिरकतच नसल्याचा हा परिणाम असल्याची प्रतिक्रिया आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे. केवळ अर्थकारण केल्याने जनता आपल्याला मत देईल हा त्यांचा भ्रम असून दोन्ही निवडणुकींमध्ये हा भ्रम दूर झाला. हे बरेच झाल्याचेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
२००९ च्या निवडणुकीत थोडक्यात विजय हुकल्यानंतर पटेल हे पुढील निवडणुकीची तयारी म्हणून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सातत्याने संपर्क ठेवतील. असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु तसे काहीही न होता पटेल यांनी थेट पुन्हा उमेदवार झाल्यानंतरच मालेगाव, बागलाणसह धुळे तालुक्यातील अनेक गावांना तोंड दाखविले. नेत्याने भलीमोठी विकास कामे केली नाही तरी चालेल. परंतु आपल्यातील सुखदु:खात सामील व्हावे ही ग्रामीण भागातील जनतेची माफक अपेक्षा असते. ही अपेक्षा पूर्ण करणाऱ्या नेत्याच्या पाठीशी जनताही असते हे अनेक ठिकाणी लागोपाठ निवडून येणाऱ्या उमेदवारांच्या विजयाचे रहस्य आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून हॅट्रीक करणारे खा. हरिश्चंद्र चव्हाण, मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे दादा भुसे यांचे उदाहरण त्यासाठी देता येईल.
पटेल यांनी पहिल्या पराभवानंतर ग्रामीण भागाशी सातत्याने संपर्क ठेवला असता तर कदाचित धुळे मतदारसंघात वेगळे चित्र दिसले असते. केवळ काही नेत्यांशी संपर्क ठेवण्याऐवजी दुसऱ्या फळीतील नेत्यांशी आणि गावांमध्ये त्यांनी नियमितपणे संपर्क दौरे केले असते तर त्यांनीही पटेल यांना साथ दिली असती, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच थेट ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्कात आलेल्या पटेल यांचा हा कमकुवतपणा हेरत विरोधकांनी पध्दतशीरपणे प्रचारात या मुद्याचा वापर केला. धनशक्तीच्या मुद्यावरही विरोधकांनी बोट ठेवले. त्यातच मोदी लाटही विरोधकांच्या कामी आली. आिँण मागील निवडणुकीपेक्षा पटेल यांचा यावेळी दणकून पराभव झाला.