झपाटय़ाने विस्तारत असलेला अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग नवीन गृहसंकुलांनी विकसित होत आहे. अनेक प्रकारच्या सुविधा या गृहसंकुलांना उपलब्ध होत असताना, या भागातील विठ्ठलवाडी करवले, कातकरी वाडी परिसर मात्र दवाखाने, पाणी, हायस्कूल या अत्यावश्यक सुविधांपासून वंचित आहे. रोट्रॅक्ट क्लब डोंबिवलीतर्फे या दोन्ही पाडय़ांचे सव्र्हेक्षण करण्यात आले. या आदिवासी पाडयात ३५ घरे आहेत. २०० ते २५० रहिवासी येथे राहतात. गावामध्ये चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यानंतरच्या शिक्षणासाठी जवळच्या हायस्कूलमध्ये किंवा कल्याण, डोंबिवली येथे जावे लागते, असे रहिवाशांनी सांगितले. गावात दवाखान्याची सोय नसल्याने बस, खासगी वाहनाने कल्याण येथे जावे लागते. गावात कुपनलिकांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. ठराविक वेळ हा पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात कुपनलिकांचे पाणी खोलवर गेल्याने पाण्याची तीव्र टंचाई येथे असते, असे सव्र्हेक्षणातून पुढे आले आहे. क्लबचे आदित्य कांबळी, अल्पना देशपांडे, डॉ्र. विशाखा दरक, इलियस सालमनी, मयूर साळवी यांनी या सव्र्हेक्षणात भाग घेतला. पाडय़ामध्ये शौचालयांची सुविधा नाही. रोजगाराचे साधन नाही. गावात काही घरांमध्ये वीजेची सुविधा आहे. प्रत्येक घरात आधारकार्ड व शिधापत्रिका आहे. शिधापत्रिकेला प्रत्येक कार्डधारकाला दर महिन्याला वीस किलो तांदूळ व पाच किलो गहू मिळतो. गावातील पाणी, दवाखाने, गावात येण्यासाठी पोहच रस्ता या सुविधा प्राधान्याने होणे गरजेचे आहे, असे मत सर्वेक्षणातून काढण्यात आले आहे.