केंद्र शासनाच्या विद्युत अधिनियम अंतर्गत जिल्हास्तरीय विद्युतीकरण समन्वय समितीची तृतीय बैठक विद्युत निरीक्षकांनी आयोजित केली होती. खासदार हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली विश्राम भवन चंद्रपूर येथे नुकतीच पार पडली.
यात येथील महाराष्ट्र वीज निर्मिती केंद्राची एकूण स्थापन क्षमता २३४० मेगाव्ॉट असूनही पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती होत नाही. काही दिवसाआधी पाऊस पडल्यामुळे सगळे युनिट बंद होते, तसेच काही काळात ६३ मेगाव्ॉटच वीज निर्मिती झाली. यावर अध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. प्लाँट लोड फॅक्टर कमी असल्याने वीज निर्मितीचा खर्च वाढतो व त्याचा भरुदड ग्राहकास बसतो ते योग्य नाही व त्यामुळे काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या. पावसामुळे पंप बंद होते व त्यामुळे संपूर्ण प्लाँट बंद करावा लागला, ही बाब सीटीपीएससारख्या भारतातील महत्त्वाच्या वीज निर्मिती केंद्रास भूषणावह नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. कोळसा साठविण्यासाठी शेड नसल्यामुळे पावसाच्या पाण्याने कोळसा ओला झाला व वीज निर्मितीत घट झाली, असे महाराष्ट्र वीजनिर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर अध्यक्षांनी धारीवाल वर्धा पॉवरसारख्या खासगी कंपन्यांनी वर्षभरातच अत्याआवश्यकतेमुळे शेड निर्मिती केली व ३० वर्षांपासून अधिक वर्ष झालेल्या पॉवर प्लाँटमध्ये अजूनही कोळसा ठेवायला कायमस्वरूपी शेड बनविलेले नाही, याची खंत व्यक्त केली व जे लवकरच बनवावे, जेणेकरून हे प्रश्न उद्भवणार नाही, असे सांगितले.
महाजनकोत सॅम्पलिंगसाठी कंत्राटे दिली असूनही सॅम्पल ग्रेडप्रमाणे पेमेंट होत नाही. मग या कंपन्यांचा उपयोग काय? येथील महाराष्ट्र वीजनिर्मिती केंद्राकडे येणारा कोळसा भेसळ असतो. तो जास्त चिकट असून त्यात मातीची भेसळ असते. यासाठी जेथून कोळसा येतो त्याठिकाणी जाऊन या वीजनिर्मिती केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे, अशी अध्यक्षांनी सूचना केली व कोळशाची कॅलोरीफिक रिझल्ट न घेता कोळसा लोडींग करतात, यावर चर्चा करण्यात आली. कोळशाच्या या समस्या कोल वॉशरी महाराष्ट्र वीज निमिती केंद्राने सुटू शकतात.
चंद्रपूर परिसरातील खासगी कोलवॉशरी भाडेतत्वावर घेऊन त्याचा उपयोग करून कोळशाचा दर्जा सुधारू शकतात, असा सल्ला अध्यक्षांनी या अधिकाऱ्यांना दिला. चंद्रपूरमधील प्रकल्पग्रस्तांना मानसिक त्रास न देता त्यांना नोकरी व प्रशिक्षण देण्यात यावे, असे खासदारांनी चर्चा केली.
या बैठकीला खासदार हंसराज अहीर, मुख्य अभियंता आर. पी. बुरडे, वसंत एम. खोकले, विनय नागदेव, कंत्राटदार प्रतिनिधी ब्रिजभूषण पाझारे, ग्राहक प्रतिनिधी सुधीर मिसार व इतर समन्वय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.