नागपूर जिल्ह्य़ात आणि जिल्ह्य़ाच्या बाहेर असलेल्या पर्यटनस्थळावरील तलाव आणि नद्यांमध्ये गेल्या दीड वर्षांत मौजमजा करण्यासाठी गेलेल्या ३५ जणांचे आयुष्य संपल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, प्रशासनाने अजूनही अशा काही धोकादायक नदी, तलावाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनेकुठेही सूचना फलक लावले नाही किंवा परिसरात आपात्कालिन व्यवस्था केली नसल्याचे समोर आले आहे.
तीन दिवसांपूर्वीच वडद गावाजवळील मंगरूळ परिसरातील तलावामध्ये आशीर्वादनगरातील सात युवक बुडून दगावले. त्यापूर्वी हिंगण्याजवळील मोहगाव झिल्पी तलावामध्ये जागनाथ बुधवारी परिसरातील तीन तरुण आणि एक युवतीला तलावात उतरणे जीवावर बेतले. सुटीचा दिवस किंवा मित्र- मैत्रिणीचा वाढदिवस असला की अनेक महाविद्यालयीन युवक- युवती शहराच्या बाहेर कुठेतरी पर्यटन स्थळी जात असतात. त्यामुळे साहजिकच जवळच असलेल्या तलावात मौजमजा करण्यासाठी ते उतरतात. मात्र, तलावात उतरणे आपल्या जीवावर बेतले जाऊ शकते याचा अनेकजण विचार करीत नाही आणि जीव गमावून बसतात.
हिंगणा मार्गावर असलेले मोहगाव झिल्पी तलाव, वाकी जवळील कन्हान नदी, पेंचजवळील कुवारा भिवसेन तलाव, वाडीजवळील सुरवाडी डॅम्प, पारशिवणी जवळील नदी, केळझर भागातील जयतगड गावाजवळील कपिलेश्वर तलावासह नागपूर शहरातील अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा तलावात कुणी पोहायला किंवा मौजमजा करीत असलेल्यांवर नियंत्रण ठेवण्यास कुठलीही प्रशासकीय व्यवस्था नसल्याचे समोर आले आहे. आशीर्वाद नगरातील सात युवक ज्या तलावात नावेवर बसून गेले तेथे आसपास पोलीस ठाणे आहे ना कुठली आपात्कालिन व्यवस्था आहे. प्रत्येक तलावामध्ये धोकादायक स्थान कुठले आहे याचा माहिती फलक असणे गरजेचे आहे. शिवाय तलावाच्या ठिकाणी कुठलीही अप्रिय घटना घडली की त्या परिसरात आपात्कालिन व्यवस्था असणे गरजेचे आहे. मात्र, अशी कुठलीच व्यवस्था नाही. प्रत्येक तलावापासून पोलीस ठाणे हे २ ते ३ किलोमीटर दूर आहेत. तलावाच्या ठिकाणी पोलीस ठाण्याचा किंवा संबंधिताचा दूरध्वनी क्रमांक, तलावातून बाहेर काढणाऱ्या त्या त्या गावातील प्रशिक्षित युवकांचे दूरध्वनी क्रमांक असणे आवश्यक आहे. मात्र, तशी कुठलीच व्यवस्था दिसून आली नाही. नागपूरपासून ५० ते ६० किलोमीटर दूर असलेल्या तलावात बुडल्याची घटना घडली की नागपूर महापालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना बोलविले जाते. मात्र, ते घटनास्थळी जातपर्यंत वेळ निघून गेली असते. त्यामुळे अग्निशमन विभागाला बोलावून काही उपयोग होत नाही. अनेकदा तलावातील मृतदेह काढण्यास कोणी समोर येत नाही, अशा वेळी गांधीसागर तलावातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम करणारे सामाजिक कार्यकर्ते जगदीश खरे यांना बोलविले जाते. रात्रीच्यावेळी तलावातून सात युवकांचे मृतदेह काढणे प्रशासनासमोर मोठे आव्हान असताना खरे यांनी ते स्वीकारून चार तासात पाण्यात राहून सर्वाचे मृतदेह बाहेर काढले.
मात्र, अग्निशमन विभागाच्या एकाही कर्मचाऱ्याची त्यावेळी हिंमत झाली नाही. तलावाच्या ठिकाणी खासगी सुरक्षा रक्षक तैनात करायला पाहिजे. मोटार बोट ठेवली पाहिजे, पोलिसांचे आणि अग्निशमन विभागाचे दूरध्वनी क्रमांक आणि इतरही माहिती असलेले सूचना फलक लावले पाहिजे. मात्र, प्रशासनाकडून कुठल्याही तलावावर अशी व्यवस्था नाही.  
या संदर्भात जगदीश खरे म्हणाले, जिल्ह्य़ात किंवा जिल्ह्य़ाच्या बाहेरील तलावामध्ये कोणी बुडाल्याचा निरोप आल्यावर साथीदारांसह घटनास्थळी पोहोचतो. मात्र, त्या ठिकाणी प्रशासनाकडून काहीच तात्काळ व्यवस्था केली जात नाही. शहरातील अंबाझरी, शुक्रवार तलावांमध्ये बुडल असलेल्या अनेक युवकांना जिवंत बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या अठरा वर्षांत शुक्रवार तलावासह विविध तलावांमधून २०२० लोकांचे मृतदेह बाहेर काढले आहे तर ८०० जणांचे प्राण वाचवले आहे. ज्यांना वाचवले आहे त्यातील अनेक जण आत्महत्या करणारे होते. पर्यटनासाठी जाणाऱ्याची संख्या बघता प्रशासनाने सर्वच धोकादायक तलावाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने आपात्कालिन व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असल्याचे खरे म्हणाले.
यावेळी आमदार सुधाकर कोहळे यांनी सांगितले, आशीर्वाद नगरातील घटनेनंतर तर जिल्ह्य़ातील सर्वच तलावाच्या ठिकाणी आपात्कालिन व्यवस्था कशी निर्माण करता येईल यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न केले जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, महापालिका आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे कोहळे यांनी सांगितले.