शहरातील शासकीय रुग्णालय सुसज्ज भासत असले तरी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने रूग्णांचे हाल होत आहेत.
३० खाटांची ही रूग्णालयाची वास्तू दर्जेदार असली तरी त्याप्रमाणे या रूग्णालयात सुविधा मात्र मिळत नाहीत. रुग्णालयात महिन्यास साधारणपणे १५० पेक्षा अधिक महिला प्रसुतीसाठी येत असल्या तरी अनेक वेळा सक्षम डॉक्टर नसल्याने त्यांची गैरसोय होते. या रूग्णालयात वैद्यकीय अधिक्षक, बालरोगतज्ज्ञ, अस्थीरोगतज्ज्ञ,  स्त्रीरोग तज्ज्ञ, सात परिचारिका, सात चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी यांची आवश्यकता आहे. या रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञच नाही. १५ पेब्रुवारी रोजी एरंडगाव येथील मच्छिंद्र ठोंबरे या गरीब शेतकऱ्याने त्याच्या मुलीला सकाळपासून प्रसुतीला आणले होते. मात्र येथील एकमेव परिचारिका प्रतिभा भावसार यांनी प्रसुती अडचणीची असून आम्ही प्रयत्न करीत आहोत असे सांगितले. यावेळी अधीक्षक बाहेरगावी गेल्याने प्रसुतीसाठी त्वचा तज्ज्ञांची मदत घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. रूग्णलयात तीन परिचारिका आणि चार कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याची माहिती मिळाली. पालकमंत्र्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.