करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव न झाल्याने भाविक निराश झाले. धूसर वातावरणामुळे किरणोत्सव होऊ शकलेला नाही. गेल्या दशकभरात अशी वेळ प्रथमच आल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.    
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिरात ठरावीक दिवशी सूर्याची किरणे देवीवर पडतात. चरणापासून सुरू होणारा हा प्रवास टप्प्यापर्यंत मुखकमलापर्यंत पोहोचतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत असते. या वर्षी सलग तिन्ही दिवशी किरणोत्सव होऊ शकला नाही.    
गेली दोन दिवस किरणोत्सव होईल, या अपेक्षेने भाविक मंदिरापर्यंत पोहोचत होते. पण त्यांची निराशा होत होती. आज अखेरच्या दिवशी तरी किरणोत्सव होईल ही आशा मनात धरून भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. सुमारे अर्धातास वाट पाहून ढगाळ वातावरणामुळे सूर्यकिरणे देवीपर्यंत पोहोचू शकली नाहीत. किरणोत्सव न झाल्याची खंत बाळगत भाविक घरी परतले.