भालजी पेंढारकर, बाबूराव पेंटर यांसारख्या दिग्गजांनी ऐतिहासिक पाश्र्वभूमीचे चित्रपट निर्माण केले. कोल्हापूरच्या या मातीचा गुण म्हणूनच माझ्याकडून ‘लगान’सारख्या चित्रपटाची निर्मिती झाली. चित्रपट महोत्सवातून देश-विदेशातील उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळाल्याने चित्रपटविषयक जाणीव समृद्ध होते. कोल्हापुरात अतिशय दर्जेदार असा चित्रपट महोत्सव झाला असून, यामुळे कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय चित्रपटजगतामध्ये लौकिक निर्माण करण्यास कारणीभूत ठरेल, असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. या वेळी ‘अनुमती’ या मराठी चित्रपटास सवरेत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला.
    येथील राजर्षी शाहू स्मारकामध्ये गेले आठवडाभर सुरू असलेल्या कोल्हापूर इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा सांगता समारंभ आज गुरुवारी रात्री झाला. या वेळी गोवारीकर बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक, संचालक पी. के. नायर यांना आनंदराव पेंटर स्मृति सन्मान पुरस्कार वितरण गोरेगाव फिल्म सिटीचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते देण्यात आला, तर आशुतोष गोवारीकर यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देण्यात आले. प्रमुख पाहुणे लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, मराठी चित्रपट निर्मात्यांच्या मागण्यांबाबत शासनाने सहानुभूतिपूर्वक विचार केला आहे. त्यांच्या मागण्यांना अनुकूल असा शासन निर्णय लवकरच जारी करण्यात येणार आहे.
    पी. के. नायर म्हणाले, कोणत्याही स्वरूपात चित्रपटाचा इतिहास सांगणाऱ्या घटकांचे जतन होण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न झाले पाहिजेत. सवरेत्कृष्ट अभिनेत्याचा बी. हेंद्रेकर पुरस्कार विक्रम गोखले यांना ‘अनुमती’ चित्रपटासाठी देण्यात आला, तर सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा स्मिता पाटील पुरस्कार ‘लंगर’ चित्रपटासाठी मनवा नाईक यांना देण्यात आला.