दुसऱ्या रडारसाठी उंच इमारतींच्या गच्चीवर जागा देण्याचे बिल्डरांचे आश्वासन फोल ठरल्यानंतर आता हवामानशास्त्र विभाग मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या जागेची चाचपणी करणार आहे. महापालिकेकडून याबाबतचे पत्र मिळाले असून लवकरच पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी दौरा होणार आहे.
सी बॅण्ड रडार बसवण्याच्या दृष्टीने हवामानतज्ज्ञांनी नुकतील परळ येथील इमारतीची पाहणी केली. मात्र ४० मजल्यांच्या या इमारतीशेजारी १०० मजल्याहून उंच इमारती उभ्या राहात असल्याने ही जागा गरसोयीची ठरली. रडार बसवण्यासाठी उंचावरील जागा आवश्यक असून आजूबाजूला कोणताही अडथळा चालत नाही. शहरातील उंच इमारतींची स्पर्धा पाहता अशी जागा मिळणे कठीण असल्याचे महापालिका व राज्य सरकार यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता महापालिकेने तलावांच्या जागा सुचवल्या आहेत. तुळशी (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान), भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, तानसा, मध्य वैतरणा (ठाणे) हे सर्व तलाव डोंगरांच्या कुशीत आहेत. डोंगरांवर रडार उभारल्यास त्याला कोणताही अडथळा येणार नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे.
पालिकेने सहा तलावांच्या क्षेत्रात रडारसाठी पाहणी करण्याबाबत कळवले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाईल. रडारसाठी उंच जागा आवश्यक आहेत सोबत इतर सुविधांच्या दृष्टीने या जागांची चाचपणी करण्यात येईल, असे हवामानशास्त्र विभागाचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले.
कुलाब्याला १७ मजली अर्चना इमारतीवरील वेधशाळेच्या रडारला मध्य मुंबईत उभ्या राहत असलेल्या टॉवरमुळे अडथळे येऊ लागले आहेत. भविष्यात उभ्या राहू घातलेल्या गगनचुंबी इमारती लक्षात घेता इतर आंतरराष्ट्रीय शहरांप्रमाणे मुंबईलाही दुसऱ्या रडारची आवश्यकता भासू लागली आहे. सी बॅण्ड रडार बसवण्यासाठी हवामान विभाग प्रयत्नशील असला तरी कोणताही अडथळा नसलेली जागा शोधणे कठीण जात आहे.
आहे मनोहर तरी..
जलाशयांशेजारी रडार उभारण्याची कल्पना मनोहर असली तरी त्यातही अडचणी आहेत. उंचावर असल्याने रडारला सिग्नल मिळवताना कोणताही अडथळा येणार नसला तरी त्या परिसरात पायाभूत सुविधा उभारणे जिकिरीचे आहे. कोणत्याही रडारसोबत यंत्र, संगणक, अभियंते, कर्मचारी आवश्यक असतात. २४ तास वीज किंवा जनरेटरची सोय आणि या जागेपर्यंत कर्मचाऱ्यांच्या प्रवासाची सुविधा असे सारे घटक आवश्यक असतात.