राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होऊ घातलेल्या आंतर- विद्यापीठ क्रीडा महोत्सव सुरू व्हायला दोन दिवस उरले असतानाच भोजन निविदेत लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा समोर आला असून कुलपतींनी ताबडतोब कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना निलंबित करून त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनामार्फत होऊ घातलेल्या या महोत्सवात तीन ते साडेतीन हजार खेळाडू, प्रशिक्षक, पत्रकार आणि इतरांच्या भोजन व्यवस्थेसाठी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विद्यापीठाने भोजन निविदा मागवल्या. त्यात एकूण आठ निविदा विद्यापीठाला प्राप्त झाल्या. त्यापैकी एक निविदा आमदार निवासमधील ब्लॅक डायमंड रेस्टॉरेंटचे संचालक तपन डे यांची होती. डे यांच्याकडे अन्न परवाना नसल्याने त्यांची निविदा विद्यापीठाने स्वीकारली नाही. मात्र, याच डे यांनी हिवाळी अदिवेशन २०१२मध्ये आमदारांना व अधिकाऱ्यांना भोजन पुरवले, हे विशेष. निविदाधारकांच्या निविदा ठरलेल्या दिवशी उघडण्यात आल्या. त्यात मे. ढगे मेसचा(कॅटर्स) दर १३१ रुपये होता. संस्कार कॅटर्स-१४२ रुपये, जयेश कॅटर्स १७८ रुपये, नुरान कॅटर्स-१९८, माउली कॅटर्स- २०७ रुपये आणि एयर पोर्ट कॅटर्स म्हणजेच ‘वऱ्हाडी थाट’चे संचालक शिंदे यांचा दर २२० रुपये असताना सर्वाना डावलून सर्वात जास्त दर असलेल्या शिंदे यांना पात्र ठरवण्यात आले.
यावर संस्कार कॅटर्सचे भूषण सोमेश्वर मुरारकर यांनी जोरदार आक्षेप घेतला असून भोजन निविदा आधिपासूनच फिक्स होती, असा आरोप त्यांनी केला आहे. भोजनावर किमान तीस लाख रुपये खर्च होणार म्हणून भोजन निविदा मागवणे गरजेचे होते. इतक्या संख्येने भोजननिविदा प्राप्त होतील, अशी अपेक्षा शिंदे यांच्याशी हितसंबंध गुंतलेल्या अधिकाऱ्यांना अजिबात नव्हती. शिंदे यांच्या भोजनाचा दर जास्त असूनही कुलसचिव डॉ. अशोक गोमासे आणि शारीरिक शिक्षण संचालक डॉ. धनंजय वेळुकर यांनी कुलगुरूंच्या म्हणण्यानुसार नवनवीन सबबी पुढे करून शिंदे कॅटर्सच योग्य असल्याचे पुन्हा पुन्हा सांगितले, असे मुरारकर यांचे म्हणणे होते. यापूर्वी अखिल भारतीय युवा महोत्सव सात-आठ महिन्यापूर्वी पार पडला. त्यावेळेसही भोजन व्यवस्था शिंदे यांना प्रदान करण्यात आली आणि भोजनाची लाखो रुपयांची बिले त्यांना अदा करण्यात आली. मात्र त्या युवा महोत्सवाकरता भोजन पुरवण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या नव्हत्या, अशी माहितीही मुरारकर यांनी दिली.
येऊ घातलेल्या क्रीडा महोत्सवानंतर अखिल भारतीय महिला हॉकी टुर्नामेंट याच महिन्यात होऊ घातली आहे. त्यानंतर वेस्ट झोन महिला स्पर्धा सुभेदार सभागृहाच्या समोरच्या मैदानावरच होणार आहे. त्याच्या निविदा अद्याप विद्यापीठाने मागवल्या नसल्याचा गौप्य स्फोट मुरारकर यांनी पत्रकार परिषदेत केला. यासर्व प्रकारामध्ये विद्यापीठ प्रशासन आणि कॅटर्सचे हितसंबंध गुंतले असून विद्यापीठाचे कुलपती यांनी ताबडतोब कुलगुरूंना निलंबित करून त्या ठिकाणी प्रशासक बसवण्याची मागणी केली आहे. यावृत्ताचे कुलसचिव डॉ. अशोक गोमासे यांनी खंडन केले असून ज्यांनी आरोप केला त्यांनीच तो सिद्ध करावा, असे स्पष्ट केले आहे. कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.