शिक्षण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे दिलेले भाषण नागपूर जिल्ह्य़ातील लाखो विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत एलसीडी स्क्रिन व दूरदर्शन संचावरून ऐकले. मोदींच्या भाषणाला विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. वीज जाणार नाही, याची काळजी घ्यावी असे आदेश दिल्यानंतरही ऐन भाषण रंगात आले असतानाच वीज गेल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाल्याचा प्रकारही काही भागात घडला.
शुक्रवारी दुपारी ३ ते ३.४५ या वेळेत पंतप्रधानांचे भाषण झाले. हे भाषण ऐकण्यासाठी शाळेने स्वयंस्फूर्तीने एलसीडी स्क्रिनची तसेच दूरदर्शन संचाची व्यवस्था केली होती. काही शाळांनी प्रत्येक खोलीत दूरदर्शन संच बसवले होते. सभागृह असलेल्या शाळांनी सभागृहात एलसीडी स्क्रिनची व्यवस्था केली होती. नागपूर जिल्ह्य़ातील सीबीएसई व महापालिकेच्या शाळा वगळता सर्व शाळांमध्ये थेट प्रसारण दाखवण्यात आले. यामध्ये ३७५० शाळांचा समावेश असून भाषण ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ६९ हजार ०६२ एवढी असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले. यासाठी १ हजार २५३ शाळांमध्ये दूरदर्शन संच, १ हजार ६६५ शाळांमध्ये रेडिओ संच, १ हजार १२८ शाळांमध्ये इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी यू टूब, संगणकाद्वारे भाषण ऐकले.
प्राप्त झालेल्या निर्देशाप्रमाणे दुपारी २.३० वाजता विद्यार्थ्यांना शाळेत एकत्रित करण्यात आले होते. भाषण ऐकण्यासाठी शिक्षकांनी दूरदर्शन व संगणकाची व्यवस्था केली होती. ज्या शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या नाहीत, त्या शाळा पंतप्रधानांच्या भाषणाचे पुनप्रक्षेपण करणार आहेत. हे भाषण सुरू असताना उपसंचालक अनिल पारधी यांनी सदर येथील अंजूमन विद्यालयात पाहणी केली. यावेळी येथे गोळा झालेले अंदाजे तेराशे विद्यार्थी मोठय़ा पडद्यावर पंतप्रधान मोंदीचे भाषण ऐकत होते. तसेच कळमना परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील ७०० विद्यार्थ्यांनी हे भाषण ऐकले. देवेंद्र दस्तुरे संचालक असलेल्या शाळेतील १६०० विद्यार्थ्यांनी मोदींचे भाषण ऐकले. यासाठी शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात एलसीडी प्रोजेक्टरची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचप्रमाणे रेल्वे प्लॅटफॉर्म शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठय़ा स्क्रिनवर मोंदीचे भाषण ऐकले. भाषण सुरू असताना विद्यार्थी टाळ्यांचा कडकडाट करून प्रतिसाद देत असल्याचेही दिसून आले.
अनेक शाळांमध्ये दूरदर्शन संच नसल्याने तेथील विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत पाठवण्यात आले होते. हा उपक्रम ऐछ्चिक ठेवल्याने काही शाळांनी कुठलीच व्यवस्था केली नव्हती. विनाअनुदानित शाळांमध्ये दूरदर्शन संच, संगणक नाहीत. त्यामुळे अशा शाळांतील विद्यार्थी पंतप्रधानांचे भाषण ऐकण्यापासून वंचित राहीले. महापालिकेच्या अनेक शाळेत ही व्यवस्था नव्हती. पंतप्रधानांचे भाषण सुरू असताना काही भागात वीज गेली. त्यामुळे पाच मिनिटे विद्यार्थ्यांना भाषण ऐकता आले नाही. एकंदरीत या उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. शहरातील मेजर हेमंत जकाते विद्यालय, जामदार शाळा, सेंट झेव्हिअर्स स्कूल, साईनाथ विद्या मंदिर, न्यू अ‍ॅपॉस्टॉलिक स्कूलमधील विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांचे भाषण विविध माध्यमातून ऐकले.

निर्देशांचे पालन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण विद्यार्थ्यांना ऐकविण्याच्या शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. बहुतांश शाळांनी भाषण ऐकण्याची व्यवस्था केली होती. दूरदर्शन संच, एलसीडी स्क्रिन आणि रेडियोच्या माध्यमातून हे भाषण ऐकवण्यात आले. विद्यार्थ्यांना ही एक चांगली संधी प्राप्त झाली. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
– अनिल पारधी शिक्षण उपसंचालक