सोलापूर महापालिका भूमी व मालमत्ता विभागातील महत्त्वाच्या पाच संचिका गहाळ केल्याप्रकरणी निलंबित नगर अभियंता सुभाष सावस्कर यांच्यासह चार अधिका-यांविरुद्ध पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी स्वत: सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंबित नगर अभियंता सावस्कर दुसरे निलंबित अधिकारी सी. के. पाणीभाते तसेच सेवानिवृत्त भूमी व मालमत्ता अधिकारी सच्चिदानंद व्हटकर व भूमापक बी. एस. नांदूरकर अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचा-यांची नावे आहेत. अंत्रोळीकर नगराजवळील राजेशकुमार नगर येथील एक एकर जागेवर पालिकेच्या ११६ कर्मचा-यांची घरे बांधण्यात आली असून, लाभार्थी कर्मचा-यांना दिलेले अलॉटमेंट लेटर व फाइल गायब झाली आहे. याशिवाय पाच्छा पेठेतील कुरबान हुसेन सभागृहालगतचे रस्ते व पालिकेच्या ताब्यात आलेली एक एकर जागा यांच्याशी संबंधित कागदपत्रांसह संपूर्ण फाइल गहाळ झाली आहे. तसेच अन्य तीन महत्त्वाच्या फाइल्सही गायब झाल्या आहेत. भूमी व मालमत्ता विभागाच्या ताब्यात असताना या सर्व महत्त्वाच्या पाच फाइल्स केवळ अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळे गहाळ झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात चौकशीअंती आयुक्त गुडेवार यांनी स्वत: सदर बझार पोलीस ठाण्यात जाऊन संबंधित दोषी अधिका-यांविरुद्ध फिर्याद नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, या गुन्हय़ात अटक करण्यासाठी निलंबित नगर अभियंता सावस्कर यांनी अॅड. शशी कुलकर्णी यांच्यामार्फत न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला आहे.