वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिराच्या पुढे पहाटे ६च्या सुमारास दरड कोसळून सुमारे चार तास वाहतूक ठप्प झाली होती. पाचगणी व महाबळेश्वरला जाणारे-येणारे पर्यटक व पाचगणीला शाळेत जाणारे विद्यार्थी यांना ताटकळत बसावे लागले.
दरड कोसळत असताना मुंबई विरार येथील माऊंट मेरी इंग्लिश स्कूलच्या तीन बसेस पाचगणीकडे चालल्या होत्या. त्यांना क्रॉस करून एक कार गेली, पण सुदैवाने दुर्घटनेतून ती वाचली. बसचे चालकाने त्वरित बस मागे घेतल्याने तीही वाचली असे बसचालक अंजुम शेख यांनी सागितले.
वाई ट्रॅफिक पोलीस राजू मुलाणी, प्रकाश फरांदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी चंद्रकांत अंबिके हे जेसीबी घेऊन सकाळी ८.३० वाजता घटनास्थळी पोहोचले. रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड जेसीबीच्या साहाय्याने बाजूला करून रस्ता सुमारे ९.३० वाजता मोकळा केला व वाहतूक पूर्ववत चालू केली.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे कनिष्ठ अभियंता पवार वाहतूक पूर्ववत होईपर्यंत घटनास्थळी येऊ न शकल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.