गेल्या वर्षभरापासून भाषा सल्लागार समितीचा कारभार तसा रेंगाळतच सुरू आहे. काही महिन्यांपूर्वी नवीन परिभाषा कोष विकसित करण्यासाठी ७० नव्या विषयांची सूची तयार करण्यात आली. यातील १० परिभाषा कोषांचे काम प्राधान्याने करण्याचेही ठरले. भाषा संचालनालयातील अधिकाऱ्यांनी प्राधान्यक्रमातील १० विषयांपैकी काही परिभाषा कोष सुधारित करण्याचा निर्णय घेतला. पण एकूणच काम कमालीचे रेंगाळले आहे. एवढे, की समितीचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना दिलेल्या गाडीचा वाहनचालक ते अजूनही शोधत आहेत! समितीचे कामकाज विनावाहकाच्या गाडीसारखेच असल्याची खोचक प्रतिक्रिया साहित्य वर्तुळात उमटत आहे.
भाषा सल्लागार समितीच्या रेंगाळणाऱ्या कामाविषयी सांगण्यास डॉ. कोत्तापल्ले फारसे उत्सुक नसतात. समितीत सध्या काहीच चाललेले नाही असे सांगताना, ‘समितीच्या बैठकांमध्ये दरवेळी काय होते, हे माध्यमांना कशाला सांगायला हवे?’ असा सवाल त्यांनी केला. मात्र, सांगण्यासारखे काही नाहीच का, असे विचारले असता डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, की गेल्या काही दिवसांत झालेल्या बैठकांमध्ये परिभाषा कोष निर्मितीच्या अंगाने काही चर्चा झाली. आम्ही ७० नवे विषय परिभाषा कोष निर्मितीसाठी काढले आहेत. सूक्ष्म जीवशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, माहिती-तंत्रज्ञान, जलभूमी व्यवस्थापन, आहारशास्त्र, संगणकशास्त्र, जैवतंत्रज्ञान (नॅनो टॅक्नोलॉजी), सागर विज्ञान, योगशास्त्र, जनसंवाद आपत्ती व्यवस्थापन या विषयांचे परिभाषा कोष नव्याने निर्माण करण्याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे.
समितीने घेतलेल्या या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विद्यापीठाकडून तज्ज्ञ व्यक्तींची यादी मागविली आहे. तथापि, ही माहिती एकत्रित झाली नाही. काही विद्यापीठांनी नावेही कळविली नाहीत. गेल्या पाच महिन्यांपासून हा पत्रव्यवहार सुरू आहे. एकीकडे केवळ पत्रव्यवहाराच्या पातळीवर रेंगाळत सुरू असणारा कारभार आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्षांच्या गाडीला वाहनचालक नसल्याने ती नवीकोरी गाडी कोणी हाकायची, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आठ-दहा महिने झाले, गाडी उभीच आहे. वाहनचालक मिळाला आहे, असे कळते. पण तो अजून माझ्यापर्यंत काही पोहोचला नाही. मीही वाहनचालकाच्या शोधात आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. कोत्तापल्ले यांनी दिली.
अध्यक्ष पुण्याला असतात, हे अधिकाऱ्यांना माहीत नाही का? वाहनचालक मिळाला असेल, तर त्यांनी ती गाडी पाठवायला हवी होती, असे सांगतानाच डॉ. कोत्तापल्ले यांनी मार्चनंतर समितीच्या कामकाजाला काहीसा वेग येईल, असे सांगितले.
विभाग सुरू, काम रेंगाळले!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद पंतप्रधान कार्यालयाचे तत्कालीन राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देण्याचे जाहीर झाल्यानंतर ‘त्यांना मराठी तरी बोलता येते का,’ अशी टीका मनसेने केली होती. त्यानंतर भाषा विकासासाठी निश्चित प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी पदाची शपथ घेताना सांगितले होते. हा विभागही सुरू झाला. पण काम अजून रेंगाळलेलेच आहे.