पुंडलिका वर दे, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव महाराज की जय, जगदगुरु संत तुकाराम महाराज की जय, अशा हरिनामामाच्या गजरात सर्वत्र सुरु होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहात आता ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, आणि भागवत गाथा पूजनाबरोबरच संगणकाची अर्थात लॅपटॉची पूजा देखील होऊ लागली आहे. त्यामुळे कष्टकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भोल्याभाबडय़ा वारकऱ्यांना ग्रंथाबरोबर होणारी लॅपटॉपची पूजा संभ्रमात टाकणारी आहे मात्र विठू नामाच्या भक्तरसात तल्लीन होणाऱ्या वारकरी सांप्रदायातील अनेक ह.भ.प महाराज्यांनी संगणकाला आता स्विकारले असल्याचे चित्र आहे. ऐरोली येथील एका अखंड नाम सप्ताहात या तीन महान ग्रंथाबरोबच लॅपटॉपची पूजा करण्यात आली.
ऐरोली येथील परमानंद अध्यात्मपीठ शिवानंद चॅरीटेबल ट्रस्ट आणि सिध्दीविनायक मंदिर विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सात दिवसाच्या अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा शुभारंभ झाला त्यावेळी लॅपटॉपचे विधीवत पूजन केले जात होते. त्यावेळी अनेक वारकरी सांप्रदायातील भक्तांना हे लॅपटॉपचे पूजन कशासाठी असा प्रश्न पडला होता. वारकरी सांप्रदायातील भक्तजन म्हणजे कष्टकरी,अशिक्षित, असा एक सर्वसाधारण समज आहे पण अलीकडे या सांप्रदायात अनेक उच्च विद्याविभूषितांनी आपली सेवा पांडूरंग चरणी दिली असल्याचे दिसून येते. व्यवसायाने आध्यापक असणारे ऐरोली येथील विद्यारत्न (पीएचडी) ह.भ.प विजय महाराज बाळसराफ यांच्या प्रयत्नाने या अखंड सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यात लॅपटॉप अर्थात संगणकाला महत्व देण्यात आले असल्याचे दिसून आले. संगणकात आता ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यासारख्या ग्रंथांना सामावून घेण्यात आल्याने या ग्रंथाची पाने उलगडण्याऐवजी लॅपटॉपची एक बटणाची कळ दाबण प्रवचनकार महाराज्यांनाही सोयीचे वाटू लागले आहे.