शासनाच्या योजनेतून तलाठय़ांना लॅपटॉप खरेदीसाठी कर्जाची सोय करण्यात आली असून त्याचा लाभ घेऊन उरणमधील सतरा विभागातील तलाठय़ांनी लॅपटॉप खरेदी केली आहेत. या लॅपटॉपमध्ये उरणमधील जनतेचे सातबारा तसेच महसुलविषयी माहितीचे संकलन करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे यापुढे आता तलाठय़ांचा कारभार पेपरलेस होणार असल्याची माहिती नायब तहसीलदार रवींद्र पाटील यांनी दिली.
 सातबाराचा उतारा पाहिजे, आठ अ चा उतारा पाहिजे. दोन दिवस झाले, फेऱ्या मारून दमलो. पसेही खर्च झाले. रोज किती फेऱ्या मारायचा, असा त्रागा करणारे अनेक जण शहरातील तलाठी कार्यालयाजवळ सापडतात. आता मात्र येत्या काही दिवसात जनतेचा हा त्रागा संपुष्टात येणार आहे. त्यासाठी शासनाने तालुक्यातील तलाठय़ांना लॅपटॉप खरेदीसाठी कर्ज पुरविले आहे.
कर्जातून घेतलेल्या लॅपटॉपमध्ये काही सॉफ्टवेअरच्या साहाय्याने सातबाराचे उतारे, गावागावांतील जमिनी विषयींची माहिती साठवून ठेवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी उरण तहसील कार्यालयात तलाठी लॅपटॉप घेऊनच बसले आहेत. लॅपटॉपमुळे महसूल विभागाची कामेही लवकर होणार आहेत. दप्तरच जवळ असल्याने गावागावांतील जनतेला थेट त्यांच्या गावातच आता त्यांच्या जमिनीची कागदपत्रे उपलब्ध होणार आहेत. अशी सुविधा उपलब्ध झाल्याने जनतेलाही याचा फायदा होणार आहे.